Abu Azmi : मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लीम आरक्षणाची मागणीही जोर धरताना दिसत आहे. मुस्लीम समाजालाही आरक्षण द्या अशी मागणी केली जात आहे. अशातच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील असं खळबळजनक वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.
समाजवादी पक्षाची संविधान बचाओ संघर्ष यात्रा अकोल्यात दाखल झाली. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी देखील यात्रे सोबत होते. मराठा समाज आक्रमक झाल्याने सरकार झुकलं आणि मराठा आरक्षण मिळालं असल्याचं अबू आजमीने म्हंटल आहे. तर, मुस्लिम समाज जर आरक्षणसाठी रस्त्यावर उतरल्यास त्यांना गोळ्या घातल्या जातील असा खळबळजनक आरोप यावेळी अबू आझमी यांनी केलाय. तर, आम्ही मुस्लिम आरक्षण हे संविधानिक मार्गाने घेऊ असं देखील अबू आझमी म्हणाले.
मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण मिळावं यासाठी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या पाय-यांवर सपाच्या आमदारांनी आंदोलन केले होते. आमदार अबू आझमी, रईस शेख यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले. मुस्लीम समाजातील नागरिकांना 5% आरक्षण मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मुस्लीमांमधल्या मागासांनाही आरक्षण द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली होती. मुस्लीमांमध्येही अनेक मागास जाती आहेत, त्याची जनगणना करुन त्यांनाही आरक्षण द्या, अशी पटोलेंची मागणी आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे यांनी आणखी एका आरक्षणाच्या लढ्याची घोषणा केली होती. येत्या काळात धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केली होती. धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी जरांगेंनी आता रणशिंग फुकलंय. रायगडावरुन जरांगेनी ही घोषणा केली होती.