Pune News : सध्या कशाचीच काही खात्री नाही... असं कुणी म्हटलं की त्याला किती रे वैचारिक बोलतोस वगैरे म्हणत हिणवलं जातं. पण, खरंच अगदी कशाचीच आणि त्यातही जगण्याची काहीच शाश्वती नाही हे पुन्हा एकदा मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळं सिद्ध झालं आहे. (Purandar) पुरंदर तालुक्यातील (Pune Pandharpur) पुणे- पंढरपूर मार्गावर दिवे येथे एक आजोबा त्यांच्या नातवाला शाळेतून घरी घेऊन जात असताना दोन मोटार सायकलची जोरदार धडक झाली. यामध्ये ते आजोबा (63) , त्यांचा नातू (4) जागेवरच पडले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढावल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील तरुण यात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळं या परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. गोकुळ धोंडीबा झेंडे ( वय 63) आणि पद्मनाभ झेंडे( वय 4) अशी मृतांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोकुळ झेंडे हे आपल्या नातवाला सायंकाळी शाळेतून घेऊन आपल्या दिवे येथील घराच्या दिशेनं निघाले होते. रस्ता ओलांडत असतानाच पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीनं झेंडे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली आणि यामध्ये त्यांच्यासह चिमुकला नातू खाली पडले. दुर्घटनेमध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नातवाचा जागेवरच मृत्यू झाला. झेंडे यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले गेले पण, वाटेतच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
स्पोर्ट्स बाईकनं दिली धडक...
प्रत्यक्षदर्शी आणि काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार ज्या दुचाकीनं झेंडे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की झेंडे यांना काही कळायच्या आतच गोष्टींना गंभीर वळण आलं. अती वेगात असल्यामुळं धडक देणाऱ्या स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या तरुणाला वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही. हे सर्वकाही इतक्या विकोपास गेलं, की घटनास्थळी असणाऱ्या संतप्त नागरिकांनी यशवर्धन मगदूम नामक दुचाकीस्वाराला अद्दल घडवण्यासाठी त्याची बाईक पेटवली.
वेगानं केला घात...
कोणत्याही वाहनाचं नियंत्रण चालकाच्याच हाती असतं. त्यामुळं अतिउत्साहीपणा दूर सारत मोठ्या सतर्कतेनं वाहन चालवलं जाणं अपेक्षित असतं. पण, कशाचीही तमा न बाळगता भरधाव वेगानं वाहनं नेणाऱ्या काही बहाद्दरांमुळं अनेकांनाच जीव गमवावा लागतो हे वास्तव बदललं जाण्याची प्रकर्षानं गरज भासू लागली आहे. त्यामुळं वाहन कोणतंही असो, वेगावर कायमच नियंत्रण ठेवा!