शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केली. त्यामुळेच आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, असा थेट आरोप राजन साळवी यांनी केला आहे. रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी यांनी नुकताच उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मला आजपर्यंत निवडणुकीसाठी तिकीट दिलं आहे. 24 तासाच्या आत त्यांनी मला उमेदवारी दिली. पण शिवसेनेची जी रचना आहे त्यानुसार, शिवसेना पक्षप्रमुख, त्यानंतर नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख असं असतं. त्यात आमच्या कोकणातील नेते, खासदार विनायक राऊत होते. कोकणातील जबाबदारी त्यांच्यावर होती," असं राजन साळवी यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, "त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी आपला उमेदवार, महाविकास आघाडीचा उमेदवार आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार आणि अनेक प्रलोभनं. आमिषं असतानाही ती बाजूला सारणाऱ्या निष्ठावंत उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. तसं ते पाठीशी उभे राहिले नाहीत. त्या ठिकाणी समोर असणारा उमेदवार किरण सामंत यांना कळत नकळत जिल्हाधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी मदत केली त्यामुळे बरोबर जाळं पेरलं आणि मला पराभवचा सामना करावा लागला".
"माझ्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांनी स्थानिक जिल्हाप्रमुख, जनता, पदाधिकारी आपल्याबरोबर घेतले," असाही आरोप त्यांनी केली.
वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवलेली असावी, असं सूचक विधान राजन साळवी यांनी केलं आहे. त्यामुळे वैभव नाईकही उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
आगामी काळात कोकणातील आणखी काही नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडतील अशी चर्चा सुरु आहे, वैभव नाईक संपर्कात आहेत का? असं विचारण्यात आलं असता राजन साळवींनी सांगितलं की, "मला याची काही कल्पना नाही. ती जबाबदारी माझ्याकडे नाही. मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी कदाचित उदय सामंत यांच्याकडे ही जबाबदारी दिली असावी".
कोकणात सावंतवाडीपासून ते चिपळूणपर्यंत कोणाला किती त्रास होतो? मनात किती खदखद आहे? असं फोन करुन विचारलं तर पाढा वाचतील असंही सूचक विधान त्यांनी केलं.