सांगली : शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा मित्र हे आपल्या साऱ्यांनाच माहित आहे. पण तसं बघायला गेलं तर शेतातील प्रत्येक किटक आणि प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र.
पण गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील येड मच्छिंद्र गावात स्थानिक लोक एका अनोख्या मैत्रीचे दृश्य पाहत आहेत. जे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नाही. एक ६० वर्षाचा वृध्द आपल्या एका अनोख्या मित्राला भेटण्यासाठी विहीरीवर येतो. हा मित्र दुसरं तिसरं कुणी नसून एक मासा आहे. त्याचा आवाज ऐकल्यावर हा मासा त्याला भेटण्यासाठी खोल पाण्यातून वर येतो.
प्रकाश पाटील यांनी या अनोख्या मैत्रीविषयी माहिती दिली, ३ जुलै रोजी ते आपल्या घरून मुलासमवेत शेतात चालले होते. त्यांना रस्त्यात काही गावकरी भेटले. त्यांनी हा मासा पकडलेला होता. त्यांनी त्याला प्रकाश पाटील यांच्या ताब्यात दिले आणि शिजवून खाण्यास सांगितले. प्रकाशने मात्र मासा न खाता तो आपल्या शेतातील विहीरीत सोडला. प्रकाश एक दिवस बादलीने पाणी काढत होता, त्यावेळी मासा बादलीजवळ आला आणि त्याने बादलीला जोरात धक्का दिला. त्यादिवसानंतर रोज मासा प्रकाश पाणी आणण्यास गेल्यावर त्यांच्या पायाजवळ येतो. प्रकाश यांनी सांगितले की, मी रोज त्याला आवाज देतो त्यानंतर तो पाण्यात वर येतो आणि मी त्याला हात लावतो.
प्रकाशने आपल्या या मित्राचे नाव नारायण असे ठेवले आहे. प्रकाश यांनी सांगितले की, ते नारायण, नारायण असे म्हणतात आणि मासा पाण्यात वर येतो. एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नाही. आज माणूस माणसाचे ऐकत नाही. त्यावेळी एक मासा माणसाचे ऐकतो आणि त्याच्याशी मैत्री करतो हे गावकऱ्यांना आश्चर्यकारक वाटते.