Tesla Office in Pune: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या एलॉन मस्क यांच्या 'टेस्ला इंडिया मोटर्स अॅण्ड इनर्जी प्रायव्हेट लिमीटेड' कंपनीने पुण्यात ऑफिस थाटलं आहे. पुण्यातील विमान नगरमधील पंचशिल बिझनेस पार्क येथे टेस्लाने भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत ऑफिस सुरु केलं आहे. मागील आठवड्यांमध्ये टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारकडून काय सवलती दिल्या जातील आणि कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक कार्स भारतात विकल्या गेल्यास काय फायदा होईल यासंदर्भातील चर्चा दोन्ही पक्षांमध्ये झाली.
टेस्ला या मुख्य कंपनीची उपकंपनी असलेल्या 'टेस्ला इंडिया मोटर्स अॅण्ड इनर्जी प्रायव्हेट लिमीटेड'ने ऑफिससाठी 5 वर्षांचा भाडेकरार केला आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं 5580 स्वेअर फुटांचं हे ऑफिस आता टेस्ला कंपनी पुढील 5 वर्षांसाठी वापरणार आहे, असं 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे ऑफिस पंचशील बिझनेस पार्कच्या बी विंगमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. या ऑफिसचा भाडेकरार 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार असून दोन्ही कंपन्यांनी 36 महिन्यांच्या लॉक इन पिरिएडनुसार हा करार केला आहे. दरवर्षी 5 टक्के भाडं टेस्लाकडून वाढवून दिलं जाणार आहे. तसेच 5 वर्षानंतर पुढे पुन्हा 5 वर्षांपर्यंत करार वाढवण्याची तरतूदही करण्यात आळी आहे. त्यामुळे हा करार पुन्हा वाढवल्यास तो 10 वर्षांसाठी लागू असेल.
रिअल इस्टेट अॅनलिटीक्स फर्म सीआरई मॅस्ट्रीक्स कंपनीच्या हवाल्याने मिळालेल्या कागदपत्रांनुसार टेस्ला कंपनी महिन्याला 11.65 लाख रुपये भाडं म्हणून देणार आहे. तसेच या करारासाठी सिक्युरीटी डिपॉझिट म्हणून 34.95 लाख रुपये 60 महिन्यांसाठी देण्यात आले आहेत.
पंचशील बिझनेस पार्कचं सध्या बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी एकूण 10 लाख 77 हजार 181 स्वेअर फुटांचं बांधकाम केलं जात आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे बिझनेस पार्क केवळ 3 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी कोरेगाव पार्क, खर्डी, वडगावशेरी, कल्याणी नगर या सारख्या ठिकाणांहून सहज पोहोचणं शक्य आहे.
इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सरकार टेस्ला कंपनीला परदेशी पुरवठादारांबरोबर करार करण्यास परवानगी देईल असं चित्र दिसत आहे. खास करुन चीनमधून वस्तू आयात करुन कार्सची बांधणी भारतात करण्याच्या टेस्लाच्या योजनेला भारत सरकार होकार देऊ शकतं. मात्र अशाप्रकारे केवळ एकाच कंपनीला सूट देण्याची सरकारची इच्छा नाही. कंपनीने आपली उपकंपनी बंगळुरुमध्ये 2021 मध्ये नोंदणीकृत केली आहे. लवकरच टेस्ला कंपनी भारतामध्ये कार निर्मितीचा कारखाना सुरु करणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने मे महिन्यात दिलं होतं.