सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र, दौऱ्याच्यावेळी मोदी यांच्याविरोधात निदर्शने होऊ नयेत, यासाठी सोलापूरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदी हे हुकूमशहा आहेत. त्यामुळेच उद्या सोलापूरात निदर्शनांसाठीही परवानगी नाकारण्यात आल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं होणार आहेत. शेती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोक मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसपीजी आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी बाळगायला सुरुवात केली आहे. या दौऱ्यापूर्वी सोलापूरच्या अनेक भागांतील वीज गायब झाली आहे. उद्या शहरातील केबल सेवा बंद असतील. तसेच अनेक रस्त्यांवर लोकांना जमण्यास बंदी घालण्यात आल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या यशामुळे काँग्रेसला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राफेल व अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला दिसत आहे. संसदेतही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे भाजप सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.