Eknath Shinde on New Cabinet: महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला. यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आपण मंत्रिमंडळात असू म्हणत अजित पवारांनीदेखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित केले आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी याबद्दल कोणतीच वाच्यता केली नव्हती. शिंदे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपुर्वी रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता विश्वसनीय सुत्रांकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहीती झी 24 तासला विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहीती समोर आली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत तसेच सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सरकार स्थापन कऱण्यासाठी राज्यपालांनी महायुतीला निमंत्रण दिलं आहे. दरम्यान राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यावेळी आपल्या भूमिका मांडल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरुन एकनाथ शिंदे अद्यापही मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेल असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी मी तर शपथ घेतोय असं सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.
"मी एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रिमडंळात राहण्याची विनंती केली आहे. शिवसेना, महायुतीच्या सर्व आमदारांची तशी इच्छा आहे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. "आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपालांना पत्र दिलं आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापन कऱण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. आज भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज्य, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र दिलं आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. "मी शिवसेनेचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही त्याच आशयाचं पत्र दिलं आहे. आमच्या मित्रपक्षांनीही तशाच प्रकारची विनंती केली आहे. सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी निमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या 5.30 वाजता आझाद मैदानात हा सोहळा पार पडला जाणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.