पनवेल तालुक्यात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.