डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटचा उत्साह

डोंबिवलीची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होते ती प्रसिद्ध फडके रोडवर... 

Updated: Nov 6, 2018, 09:26 AM IST
डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटचा उत्साह title=

डोंबिवली : अवघ्या देशात दीपपर्व साजरं होतं... पण प्रत्येक राज्याची, शहराची, गावाची अगदी छोट्याशा वाडीचीही दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी पाहायला मिळते... असंच काहीसं आहे डोंबिवलीचं... डोंबिवलीची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होते ती प्रसिद्ध फडके रोडवर... 

ही दिवाळी असते तरूणाईची... रोजच्या जगण्यातला ताणतणाव बाजूला ठेऊन, सर्व चिंता दूर ठेऊन, नवनवे कपडे घालून, तारूण्यसुलभ नखरे करत डोंबिवलीतले तरूण तरूणी नरक चतुर्दशीच्या दिवशी फडके रोडवर एकत्र येतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. 

फडके रोडवर सुंदर रांगोळ्या घालून, ढोलताशांच्या गजरात या तरूणाईचं स्वागत केलं होतं. गणेश मंदिर संस्थानाने या तरूणाईला आपल्या उपक्रमात सामावून घेत खास या पहाटेचं युवा शक्ती, युवा भक्ती दिन असं नामकरणही कित्येक वर्षांपूर्वीच केलंय.

इथे शाळेतले, कॉलेजमधले मित्र एकत्र येतात. शाळा संपल्यानंतर एकमेकांपासून दूर गेलेले मित्र मैत्रिणी इथे परत भेटतात... 

गप्पा, त्यांच्या साथीला मधूर फळांचे रस, बदलत्या युगानुसार पिज्झा यांचा अल्पोपहार अशा मस्त वातावरणात डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी साजरी करतात.