कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : सगळ्यात जास्त प्रकाश, भरपूर उत्साह आणि आनंदी आनंद घेऊन येणारी दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आलीय, दिवाळी गोड करणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फराळ, घरोघरी सध्या फराळाची लगबग सुरू आहे. ठाण्यातल्या मेधा देशपांडे यांच्याकडचा फराळ परदेशी निघाला आहे.
अशी लगबग फराळाच्या सगळ्याच दुकानांमध्ये किंवा घरगुती उद्योगांमध्ये सध्या दिसून येत आहे, पण ही लगबग आहे फराळ सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी, मेधा देशपांडेंनी पंधरा वर्षांपूर्वी दिवाळीच्या फराळाचा हा उद्योग सुरू केला. फराळाची चव लोकांना आवडली.
ठाणेकरांनी मेधा देशपांडेंच्या फराळावर मनसोक्त ताव मारला. साहाजिकच हा उद्योग आणखी वाढत गेला. आता थेट परदेशात त्यांचा फराळ पोहोचायला लागलाय. अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर,ऑस्टेलिया या देशांतल्या राहणा-या भारतीयांपर्यंत हा फराळ पोहोचवला जातो.
या वर्षी असा शंभर किलो फराळ परदेशांत रवाना झालाय. तर चारशे किलो फराळ ठाणेकरांसाठी तयार आहे. परदेशात फराळ पाठवण्यासाठी जूनपासूनच बुकिंग सुरू होतं. सातशे रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत या फराळाची विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत.
गेली पंधरा वर्ष मेधा देशपांडे हा व्यवसाय समर्थपणे सांभाळतायत. काळानुसार त्यांनी त्यांच्या फराळामध्ये आवश्यक ते बदलही केले. सध्या त्यांच्या डाएट फराळाला जास्त मागणी आहे.
मेधा देशपांडे यांच्या या दिवाळी फराळ उद्योगामुळे जवळपास २० लोकांना रोजगार मिळाला आहे. गेल्या पंधरा वर्षांत ठाणेकरांपुरता मर्यादित असलेला हा फराळ सातासमुद्रापार पोहोचला. आता भविष्यात जास्तीत जास्त देशांमध्ये हा फराळ पोहोचवण्याचा मेधा देशपांडेंसह त्यांच्याबरोबर काम करणा-या महिलांचा निर्धार आहे.