'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा', म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'इतकी वर्षं...'

Eknath Shinde on Bharat Gogavle: रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.   

शिवराज यादव | Updated: Jan 20, 2025, 04:23 PM IST
'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा', म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'इतकी वर्षं...' title=

Eknath Shinde on Bharat Gogavle: रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील आपल्या दरे गावी एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर वरिष्ठांसोबत माझी चर्चा झाली नाही. पालकमंत्रीपदाबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे. अशा निकालाबाबत आम्हाला अपेक्षा नव्हती. जिल्ह्यात पालकमंत्री पदाबाबत माझ्या बाजूने वातावरण झालं असताना असा निकाल कोणालाही न पटणारा आहे. अनपेक्षित निकाल आहे  अशा शब्दांत भरत गोगावले यांनी नाराजी बोलून दाखवली. शेवटी आता वरिष्ठांनी  दिलेला निर्णय मला आणि माझ्यासह आमच्या समर्थकांना मान्य करावा लागेल. परंतु पालकमंत्री पदाबाबत जो काही वरिष्ठांनी निर्णय दिलाय तो कोणालाही न पटणारा आहे. आमचे  नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

भरत गोगावले यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, "अपेक्षा करणं यात वावगं काय? इतकी वर्षं त्यांनी रायगडमध्ये काम केलं आहे. अपेक्षा ठेवणं, मागणी करणं यात काही चुकीचं नाही. महायुतीमध्ये चर्चा करुन मार्ग काढू". 

दरम्यान साताऱ्यातील आपल्या गावी जाण्यावरुन होणाऱ्या टीकेवर ते म्हणाले की, "कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. मी येथे कामात आहे. नवीन महाबळेश्वरा हा मोठा प्रोजक्ट आहे. याच्या मागे लागलो आहे. मी गावी आलो की नाराज झाले असं म्हणतात. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावं लागेल, या भागात फिरावं लागेल. प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा मोठा परिसर आहे. 235 गावं अंतर्भुत आहेत. 295 गावांनी आणखी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी जी कामं करायची आहेत ती भुमीपूत्र म्हणून घ्यावी लागतील". 

पुढे ते म्हणाले, "या भागाचा कायापालट करणं हाच माझा उद्देश आहे. संपूर्ण विकास करणं, महाराष्ट्रात पर्टयटनाला चालना, वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना विकसित करणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना जिथे शक्यत आहे त्याची पाहणी करा असं सांगितलं आहे. काही ठिकाणी आम्ही, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील. या भागाचा विकास, कायापालट करणं, आणि अमूलाग्र बदल घडवणं तसंच इतिहास, संस्कृती जोपासणं, वा़ढवणं हादेखील उद्देश आहे".