संभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला

Crime News Today In Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

विशाल करोळे | Updated: Jan 15, 2025, 12:41 PM IST
संभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला title=
Crime News Today Young Student Murdered in His Flat over College Dispute in Sambhajinagar

Crime News Today In Marathi: छत्रपती संभाजीनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 19 वर्षीय विद्यार्थ्याची अज्ञातांनी गळा चिरुन हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचा मृतदेह बंद असलेल्या फ्लॅटमध्ये सापडला आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे वय 19 असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या केली. प्रदीप निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांमध्ये वाद झाले होते. तू एकटक का पाहतो, कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांती रोजी रात्री त्याचे मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या फ्लॅटवर जात त्याला गळा चिरून मारून टाकले. मंगळवारी रात्री ११.३० वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

मूळ माजलगावचा असलेला प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. एक मावसभाऊ व अन्य तीन मित्र, असे सोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. मंगळवारी महाविद्यालयातून सर्व जण परतले. संध्याकाळी त्याचा भाऊ व अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीपचा गळा कापलेल्या अवस्थेत होता. तर प्रदीप रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

धुळ्यातील त्या खुनाचा उलगडा

दारू पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करत असल्याने पुतण्यानेच काकाचा खून केल्याची घटना घडली आहे. 11 जानेवारी रोजी कोंडाईबारी घाटात विसरवाडी येथील सईद शहा याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना मयताचा पुतण्या व त्याचा मित्र यांनीच मयत सईदला मारहाण करून त्याच तोंड बांधून, हाता बांधून जिवंत दरीत फेकल्याचे तपासासमोर आले आहे. मयत सईदला दारूचे व्यसन होते आणि तो दारू प्यायलानंतर आरोपीच्या कुटुंबीयाला शिवीगाळ करत होता. याचाच राग आल्याने सईदचा काटा काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.