मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर गेलीय. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळा असे निर्देश शासनाने दिले आहेत. यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. असे असताना देखील काही राजकीय नेत्यांनी हे नियम धाब्यावर बसवलेले दिसून आले.
राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत गांभीर्य राहिलं नाही का ? अशी स्थिती राज्यात निर्माण झालीय. राज्यात ज्या पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्या पुण्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी एका शाळेच्या जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली. खरं तर भुजबळांना हा कार्यक्रम टाळता आला असता पण तरीही त्यांनी तसं केलं नाही.
हीच गोष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता पाटलांच्या बाबतीत घडलीय. सरकारचे स्पष्ट निर्देश असतानाही पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
तर शिर्डीत शिवसेना खासदार सदाशीव लोखंडे यांनी बंदी असतानाही नगरप्रदक्षिणेत सहभाग घेतला. नगर प्रदक्षिणेवर बंदी असल्याचं सांगितल्यावर त्यांनी आपल्या कृतीचं लंगडं समर्थन केलं.