राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येईल, शिवसेना विरोधी पक्ष - नाना पटोले

'राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.'

Updated: Sep 4, 2019, 08:39 AM IST
राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येईल, शिवसेना विरोधी पक्ष - नाना पटोले title=

यवतमाळ : राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना राहणार असून भाजपचा पत्ता देखील सापडणार नाही, असे भाकीत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्तविले. यवतमाळ येथे आयोजित महापर्दाफाश सभेत ते बोलत होते. 

शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या भाजप-शिवसेना सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मातीत गाडा, असे आवाहन करताना नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पत्नी अमृता फडणवीस यांना बढती देण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक विभागांचे सरकारी खाती मुख्यमंत्र्यांनी अॅक्सिस बँकेत वळविली आहेत. परिणामी त्यांच्या अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. 

देशप्रेमाच्या नावावर मते मिळविणाऱ्या भाजपने देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील मंत्री दुष्काळ आणि पूर्वस्थितीत जोकरगिरी करून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करीत आहेत. पवित्र पोर्टल, सरळ सेवा भरती आणि ऑनलाईन नोंदणीत पैसा लाटून बेकारीत वाढ करण्याचे पाप सरकारने केल्याचा आरोपही पटोले यांनी केला.