मुंबई : राज्यात नुकतंच अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यांवर आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विविध भागांचे दौरे केले आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आल्याची घटना घडली आहे.
आज मुख्यमंत्री ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळच्या नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांना भेट देत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार पाहणी केली. त्याचसोबत तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमने-सामने आल्याची घटना घडली.
मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचं पाहताच प्रचंड गर्दी झाल्याचंही दिसून आले. कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.
दरम्यान यावेळी पूरग्रस्त भागांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. मात्र तरीही एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.