महावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! जानेवारीच्या बिलात मिळणार घसघशीत सूट

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महावितरण कंपनीकडून गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलामध्ये 120 रुपयांची सवलत दिलीये. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 1, 2025, 01:28 PM IST
महावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! जानेवारीच्या बिलात मिळणार घसघशीत सूट title=

Go-Green Service : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महावितरण कंपनीने त्यांच्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून गो-ग्रीन सुविधा निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलावर 120 रुपये सूट देण्याची घोषणा केली आहे. 'कागद वाचवा, पर्यावरण वाचवा' या संकल्पनेअंतर्गत महावितरणकडून गो-ग्रीन सुविधा राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना त्यांच्या मासिक वीज बिलावर 10 रुपयांची सूट दिली जाते. अशातच आता पुढील बारा महिन्यासाठी पहिल्याच वीज बिलात 120 रुपयांची सूट देण्यात आलीये. 

महावितरणच्या ग्राहकांनी जर गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडला तर त्यांना छापील कागदी वीज बिलांऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येणार आहे. महावितरणने हा निर्णय गो-ग्रीन ग्राहकांसाठी घेतला आहे. 

महावितरणचा गो-ग्रीन ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

3 कोटी एलटी ग्राहकांपैकी आतापर्यंत केवळ 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडला आहे. सध्या या सुविधेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठी किंवा गो-ग्रीन सुविधेचे प्रमाण अधिक होण्यासाठी महावितरणने गो-ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वर्षाच्या सुरुवातीलाच वीज बिलामध्ये 120 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना महावितरणकडून गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडण्यासाठी SMS पाठविण्यात येणार आहेत. 

जर ग्राहकांची मागणी कायम राहिल्यास पुढील वर्षी देखील वीज बिलांवर 10 रुपये मासिक सवलत देण्यात येईल असं महावितरणकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील महावितरणकडून करण्यात आले आहे. त्यासोबतच अधिक माहितीसाठी महावितरणने त्यांच्या ग्राहकांना www.mahadiscom.in वर लॉग इन करण्याची देखील  विनंती केली आहे.