Chandrakant Patil On Udayanraje Bhosale: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर (Chatrapati Shivaji Maharaj) राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय. या वादानंतर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे भाजपची कोंडी झाल्याचं दिसतंय. अशातच आता उदयनराजेंना शांत करण्यासाठी भाजपने मराठा चेहरा असलेल्या चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) मैदानात उतरवलं आहे. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत भावूक वक्तव्य केलंय.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांसाठी आदरणीय व्यक्तीमहत्त्व आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून चुकून काही चूक झाली असेल तर त्यांनी हा विषय आता इथे संपवावा, अशी हात जोडून विनंती चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंना केली (Chandrakant Patil On Udayanraje Bhosale) आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. तसेच ते आमचे आदरणीय देखील आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे याशिवाय त्यांचा उल्लेख करणेही योग्य नसल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी यावेळी केलंय.
ज्या राज्यपालांनी शिवनेरीवर पायी जाऊन छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं, त्या राज्यपालांकडून चुकून काही शब्द निघाले असतील, मात्र आता आपल्याला हा विषय संपवावा, अशी मी उदयनराजेंना हात जोडून विनंती करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यावेळी भर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil Press Conference) हात देखील जोडले आहेत.
आणखी वाचा - "पुरंदरे यांचे लिखाण विकृत"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम
दरम्यान, शिवसन्मान यात्रेच्या (Shivsanman Yatra) माध्यमातून राज्यपालांना हटवण्याची मागणी उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) लावून धरली होती. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांच्या विनंतीचा मान उदयनराजे राखणार का? की आणखी आक्रमक भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.