विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : जिल्ह्यातल्या केज (Beed Kaij) तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पाथरा इथे एका तरुणाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार धारूर पोलीस ठाण्यात दाखल केली. वैष्णवी शेटे असं या मुलीचं नाव आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा तपास सुरु केला. पण याप्रकरणात जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा पोलिसांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या पतीलाच आत टाकलं. तसंच त्या मुलीचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मुलीच्या मामा-मामी यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
19 जानेवारीला कृष्णा शेटे नावाच्या तरुणाने आपली पत्नी वैष्णवी शेटे बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. धारुर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय आटोळे यांनी लागलीच तपास सुरु करत वैष्णवी शेटे आणि तिच्याबरोबर असलेल्या रोहित लांबूटे या तरुणाला नगर जिल्यातल्या निर्मळ पिंप्री तालुक्यातील राहता इथून ताब्यात घेतलं. पोलिसांनी या मुलीची चौकशी सुरु केली, यात समोर आलेल्या माहितीने पोलिसांनाही धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या जबाबात वैष्णवीने आपण अल्पवयीन (Minor) असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तिच्या शाळेतून जन्म दाखला मागवला. तर त्या दाखल्यावर तिची जन्म तारीख 24 एप्रिल 2008 अशी होती. वैष्णवी अवघ्या तेरा वर्षांची असल्याची पोलिसांची खात्री पटली. वैष्णवीने दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन असतानाही तिचा मामा सागर अशोक धोंगडे याने 20 नोव्हेंबर 2021 रोजी तिचं लग्न धारूर इथल्या कृष्णा वैजनात शेटे या तरुणाशी लावून दिलं.
हे ही वाचा : PM Modi Gold Statue: पीएम मोदी यांची सोन्याची मूर्ती, वजन आणि किंमत ऐकून व्हाल थक्क
हा बालविवाहाचा (Child Marriage) प्रकार असल्याने पोलिसांनी मुलीचा मामा सागर अशोक घोगडे, आणि मामी (रा. जानेगाव) वडील महारूद्र बबन पांगे, आई सिंधु महारूद्र पांगे, भाऊ ओमकार महारूद्र पांगे, (रा. पाथरा), नवरा कृष्णा वैजनाथ शेटे, सासु शिवकन्या वैजनाथ शेटे, दिर गणेश वैजनाथ शेटे, जाऊ वैशाली गणेश शेटे, (रा. धारूर), नवनाथ पटणे (रा. शेलगाव-गांजी) या दहा जणांच्या विरुध्द युसुफवडगाव पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 चे कलम 10 आणि 11 नुसार गुन्हा दाखल केला.
बालविवाह आणि शिक्षा
कृष्णा शेटे याने त्याची बायको वैष्णवी हरवल्याची तक्रार दाखल केली. पण माहीत असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्यासह दहा लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बालविवाह विरोधी कायद्यानुसार लग्नावेळी मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी नसावं. अल्पवयीन मुलीचं किंवा मुलाचं लग्न केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 नुसार बालविवाह लावून देणारे यांना दोन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी या कायद्यात तरतूद आहे.