'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 28, 2025, 04:35 PM IST
'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या title=

Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत. ज्यामध्ये अनेक वर्ष त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांवर  कारवाई यांचा समावेश होता. तसंच मुख्यमंत्री 5 फेब्रुवारीला आष्टीत येणार आहेत. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि 2800 कोटींचा एका प्रकल्पासंबंधी ते येणार आहेत अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. 

"परळी तालुक्यातील वर्धापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर, शिरसाळा पोलीस स्टेशन येथे 10 ते 17 वर्षांपासून सतत पदावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात अशी मागणी केली," असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढे ते म्हणाले, वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे नंबर, पुरावे, कागदपत्रं पोलिसांडे दिले आहेत. ते सगळे सहआरोपी झाले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

परळी नगरपालिकेचं विशेष ऑडिट व्हावं. एका एका व्यक्तीच्या नावे 46 कोटी उचलले आहेत. आरोपी विष्णू चाटेच्या नावेही पैसे उचलले होते. एकाच रस्त्यासाठी पाच वेळा पैसे उचलले आहेत. मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, कॅमेरा सुरु करुन परळीत फिरावं. कोणता रस्ता योग्य आहे याचं प्रमाणपत्र मीडियानेच द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

"करुणा मुंडे यांच्या गाडीत ज्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्याने पिस्तूल ठेवलं, तो साडीतला व्यक्ती कोण याचं कटकारस्थान उघड करावं. त्यांना तोंडावर स्कार्फ लावला होता. ते पोलीस अधिकारी आजही बीड पोलीस दलात आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यांचं निलंबन व्हावं. दोषी सापडले तर सेवेतून काढलं जावं. किंवा बाहेर जाऊन नवीन टोळ्या तयार कराव्यात. भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस अधिकारी 15 वर्षांपासून तिथेच आहे. त्याचे 15 जीसीबी आहेत. 100 राखेचे टिपर आहेत. मटकावाल्याची अर्धी भागिदारी आहे," असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. 

"परळी थर्मलमध्ये गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर आहेत. बदली अधिनियम 3 वर्षांचा आहे. परळी थर्मलमधील कोणत्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी 20 वर्षं राहण्याची परवानगी दिली याचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. स्वतंत्र विभागालाही पत्र देत आहे," असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. 

"परळी थर्मलमधील अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत. कोणाचे आहेत त्यांची यादी माझ्याकडे आहे, ती यादी मी पोलिसांकडे देणार आहे. थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे. त्यांची नावं वाचून सर्वजण आश्चर्यचिकत होतील. अवैध वाहतूक आजही सुरु आहे. दिवसा घाबरुन बंद आहे, पण रात्री ही राख उचलली जाते. ही राख बाहेरच्या राज्यातील, जिल्ह्यतील बंद झाली, पण आमच्या जिल्ह्यांअंतर्गत सुरु आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हावी," अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे. तसंच भागिरथ यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणीही केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.