धक्कादायक! 40 दिवसांपूर्वी घरातून निघाला अन् गायब झाला... आधार कार्डमुळे उलघडलं कुजलेल्या मृतदेहाचे रहस्य

Bhandara Crime : 40 दिवसांपूर्वी ही व्यक्ती घरातून काहीच न सांगता अचानक निघून गेली होती. मात्र अचानक साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इटगावमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे

आकाश नेटके | Updated: Apr 8, 2023, 12:00 PM IST
धक्कादायक! 40 दिवसांपूर्वी घरातून निघाला अन् गायब झाला... आधार कार्डमुळे उलघडलं कुजलेल्या मृतदेहाचे रहस्य title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने भंडाऱ्यात (Bhandara News) एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 40 दिवसांपासून ही व्यक्ती बेपत्ता होती. मात्र अचानक या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आधार कार्डवरुन (Aadhar Card) ओळख पटल्याने ही व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी (Bhandara Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

गेल्या 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या योगेश सीताराम लोखंडे या 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह इटगाव येथील शेतालगतच्या पाटामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासात मृताच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. त्याच्या मृत्यूचे कारण घातपात की अपघात हे रहस्य मात्र कायमच आहे.

पवनी येथील पद्मा वॉर्डात राहाणारे योगेश लोखंडे 27 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. ते ठेकेदारीचा व्यवसाय करत होते. महिनाभरापूर्वी योगेश लोखंडे घरातून निघून गेले होते. नातेवाईकांनी शोध घेऊनही थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर इटगाव येथील शेतालगतच्या पाटामध्ये योगेश लोखंडे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. इटगाव येथील पोलिस पाटलांना पाटामध्ये व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती मिळाली. याची माहिती गावच्या पोलीस पाटलांनी पवनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांना पंचनामा करताना मृतदेहाच्या खिशामध्ये असलेल्या पाकिटात आधारकार्ड मिळाले. त्यावरील पत्ता आणि फोटोवरून माहिती काढली असता मृत व्यक्ती योगेश लोखंडे असल्याचे तपासात पुढे आले. मिळालेले प्रेत कुजलेल्या अवस्थेत इटगाव रस्त्यावरील प्रकाश रेहपाडे यांच्या शेतालगत असलेल्या पाटामध्ये आढळून आले होते. या सर्व प्रकारानंतर संपूर्ण गावामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठवले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पवनी पोलीस करत आहेत.

मित्रासाठी मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावून बसला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात प्रेमाच्या त्रिकोणातून घडलेल्या एका घटनेतून एका तरुणाचा जीव गेला होता. एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम असल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मित्रालाच जीव गमवावा लागला आहे. भंडारा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. मृत तरुण मित्रासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याची हत्या केली होती.