आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी (IIT Madras Director V Kamakoti) यांच्या गोमूत्रावरील वक्तव्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी त्यांच्या बचावासाठी धाव घेतली आहे. "एक गट म्हणत आहे की ते गोमांस खातील कारण तो त्यांचा अधिकार आहे. मग जेव्हा दुसरा गट रोग बरे करण्यासाठी गोमूत्राचा वापर करतो, तेव्हा ते टिप्पणी का करत आहेत?" अशी विचारणा करताना त्यांनी ही टीका निराधार असल्याचं म्हटलं आहे.
"आयुर्वेदातही पवित्र द्रव म्हणून गोमूत्राचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचं सेवन केलं जाऊ शकतं. मी अनेक रुग्णांना ते पिताना पाहिलं आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच घरासमोर अंगण शेणाने सारवताना त्यातही गोमूत्र टाकण्याची आमची परंपरा आहे. ते एका खताप्रमाणे काम करतं. जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही ते घेऊ नका. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या भावना का दुखावत आहात? तामिळनाडूच्या राजकारणात हीच समस्या आहे," असंही त्या म्हणाल्या आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना कामकोटी यांनी एका संन्यासीचा किस्सा सांगितला होता, ज्यामध्ये वडिलांना ताप आला असता गोमूत्राने उपचार करण्यात आले. यानंतरच वादाला तोंड फुटलं होतं. "संन्यासी आले तेव्हा [अप्पा] त्यांना तीव्र ताप आला होता आणि ते डॉक्टरांना बोलवण्याचा विचार करत होते. मी संन्यासीचे नाव विसरलो, पण त्यांनी 'गोमुत्रन पिनामी' असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी लगेच गोमूत्र प्यायले आणि 15 मिनिटांत ताप कमी झाला," असं कामकोटी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की, गोमूत्रात दाहक-विरोधी, जीवाणूरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात आणि ते पोटातील चिडचिडेपणाच्या सिंड्रोमवर उपचार करण्यास मदत करू शकतात.
Chennai, Tamil Nadu: Responding to IIT Madras Director Kamakoti's statement on 'Gaumutra,' BJP leader Tamilisai Soundararajan says, "...In Tamil Nadu, we spray gaumutra in front of houses. It may act as a pesticide and has some antibacterial properties..." pic.twitter.com/UmLeRKqZkW
— IANS (@ians_india) January 21, 2025
कामकोटी यांनी आपल्या विधानाची आणि दाव्याची पाठराखण करताना संशोधनाचा दाखला दिला. "मी अमेरिकेत केलेले पाच संशोधन पत्रे पुढे पाठवेन जिथे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की गोमूत्रात फायदेशीर घटक आहेत. ते वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे," असं ते म्हणाले.
कामकोटी यांच्या या वक्तव्यावरुन मात्र चर्चासत्र सुरु झालं. यानंतर अनके राजकीय नेत्यांनी कामकोटी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. काँग्रेस खासदार कार्ती पी चिदंबरम यांनी हे दावे "छद्मविज्ञान" म्हणून फेटाळून लावले. "आयआयटी मद्रासच्या संचालकांनी छद्मविज्ञानाची विक्री करणे अत्यंत अयोग्य आहे," असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. द्रमुकचे वरिष्ठ नेते टीकेएस एलांगोवन यांनीही अशाच भावना व्यक्त करत म्हटलं की, "ते डॉक्टर नाहीत. डॉक्टरही हे लिहून देणार नाहीत. आजार बरं करण्यासाठी गोमूत्र प्या असं कोणीही म्हणणार नाही. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की त्यांना आयआयटीऐवजी एम्समध्ये न्यावं".
दरम्यान, तामिळनाडू भाजपाचे प्रमुख के अन्नामलाई यांनीही कामकोटी यांची पाठराखण केली आहे. द्रमुक आणि इतर याचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी कामकोटी यांच्या कामगिरीचे कौतुक केलं आणि प्राध्यापकांचे वक्तव्य वैयक्तिक होते आणि वैद्यकीय सल्ला म्हणून नव्हते असं सांगितलं.