Ambarnath Teacher:अंबरनाथ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथच्या पश्चिमेच्या साउथ इंडियन शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतप्त वातावरण आहे. या निर्दयी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
विद्यार्थ्याला इंग्रजी शब्दाची स्पेलिंग बोलता आली नाही म्हणून शिक्षिकेने दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या पाठीवर आणि पायावर काठीने अमानुषपणे मारहाण केली. काठीने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या साउथ इंडियन शाळेत हा प्रकार घडला आहे. वर्गशिक्षिका विजयश्री शकेवार हिने मुलाच्या पायावर आणि पाठीवर काठीने अमानुष मारहाण केली होती. विद्यार्थ्याच्या आईमुळं ही घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी हा शाळेतून आल्यानंतर गप्प गप्प होता. कोणाशीही बोलत नव्हता. तेव्हा त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन त्याची विचारपूस केली. तेव्हा तो रडायला लागला. आईने विश्वासात घेऊन त्याला काय घडलं ते विचारले, तेव्हा त्याने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. या प्रसंगानंतर आईदेखील हादरली आहे. मुलाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षेकेविरोधात तिने पोलिसांत धाव घेतली.
मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षिका विजयश्री शकेवार हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून शिक्षेकेला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. पथ्रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदी येथील खासगी संस्थेच्या शाळेतील प्रकार असून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार माहीत होताच गावकरी चांगलेच आक्रमक झाले असून संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाच्या कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. हजारो गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतल्यानंतर शिक्षकाने शाळेतच कोंडून घेतले होते. पोलीसांनी शिक्षकाला आमच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान शिंदी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे.