जयेश जागड, झी मीडिया, अकोला : बुधवारपासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र असे असले तरी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी विविध शक्कल लवढवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. अशातच अकोल्यामध्ये कॉपीसाठीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अकोल्यामध्ये बारावीच्या पहिल्याच इंग्लिशच्या पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यासाठी एका भावाने आपल्या बहिणीचा हटके शक्कल लावलीय. हा धक्कादायक प्रकार आहे अकोल्यातील पातूर येथील आहे. पातूरच्या परीक्षा केद्रांवर बहिणीला कॉपी पुरविण्यासाठी भाऊ चक्क तोतया पोलीस बनल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांदरम्यान 21 फेब्रुवारीला चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला पकडण्यात आलं आहे. या पोलिसाचे सॅल्यूट करतानाच बिंग फुटल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम खंडारे असं या तोतया पोलिसांचं नाव आहे. पोलिसांनी या तोतया पोलिसाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची इतकी प्रकरणं
बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 58 गैरप्रकारांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक 26 प्रकरणे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पुण्यात 15 गैरप्रकारांची नोंद झाली. बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी नारळ फोडून केला परीक्षा केंद्रात प्रवेश
लातूरमधील एका बारावीच्या परीक्षा सेंटरवर पेपरला जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या आणलेला पॅड रस्त्यावर खाली ठेवत त्याची पुजा करत समोर नारळ फोडत परीक्षा केंद्रावर प्रवेश केलाय. पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांनी आपला पेपर सोपा जावा म्हणून हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. हे कृत्य करताना त्यांनी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.