Kolhapur News : वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ संपता संपत नाहीय. राज्यात 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून संबंधित प्रक्रिया वेगात पूर्ण करायचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच दिले आहेत. मात्र प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून नागपूर आणि नाशिकनंतर कोल्हापुरात देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. कागदपत्र तपासणी संदर्भातल्या दोन वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला असून यातूनच हजारो परीक्षार्थींची कागदपत्र तपासणीची तारीख उलटून गेली त्यामुळे या इच्छुकांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहता येणार नाही. यामुळे परीक्षार्थींनी या सर्व कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. तर, ऑगस्ट महिन्यात झालेल्या परीक्षेत एकूण 3 लाख 15 हजार 768 परीक्षार्थींनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 2 लाख 71 हजार 838 परीक्षार्थी 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले होते.
पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती विभागात 15 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित होते. तर, सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर विभागात 44 दिवसांत, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर विभागात 40 दिवसांत तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, पुणे या विभागात प्रत्येकी 20 दिवसांत वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरू असून यामुळे परीक्षार्थी यांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत.
नागपूर आणि नाशिकनंतर कोल्हापुरात देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. कारण कागदपत्र तपासणी संदर्भातल्या दोन वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला असून यातूनच हजारो परीक्षार्थींची कागदपत्र तपासणीची तारीख उलटून गेली त्यामुळे या इच्छुकांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहता येणार नाहीय. तर लेखी परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने गुण मिळवून सुद्धा केवळ तारखांचा घोळ झाल्यामुळे हे परीक्षार्थी भरती पासून वंचित राहणार आहेत.
इतर विभागांमध्ये एक दिवस वाढवून देण्यात आला आहे. तशाच पद्धतीने आम्हाला देखील एक दिवस वाढवून मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी वन विभागाकडे अर्ज केला आहे.मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.त्यामुळं राज्यभरातून आलेले विद्यार्थी संभ्रमात असून वन विभाग आपल्याला न्याय देईल अशी त्यांना आशा आहे. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर कोणत्या तोंडाने घराकडे जायचं अशी खंत देखील परीक्षार्थींनी बोलून दाखवली असून या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून सरकार याकडे काय निर्णय घेणार हे पहा ना महत्त्वाचा असणार आहे.