बिबट्याने शिकार समजत महिलेवर केला हल्ला, 100 फूट फरफटत नेलं अन् तिथेच...; पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना

पुण्यात बिबट्याने महिलेवर हल्ला करत त्याला 100 फूट फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.   

शिवराज यादव | Updated: Oct 9, 2024, 05:46 PM IST
बिबट्याने शिकार समजत महिलेवर केला हल्ला, 100 फूट फरफटत नेलं अन् तिथेच...; पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना title=
(File Photo)

पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जुन्नरच्या वनक्षेत्रात मार्च महिन्यापासून बिबट्याच्या हल्ल्यात झालेला हा सातवा मृत्यू आहे. "बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला हे नक्की आहे. आम्ही बिबट्याला शोधण्याची आणि पकडण्याची मोहीम सुरू केली आहे, पिंपरी-पेंढार आणि आसपासच्या भागात 40 पिंजरे आणि 50 कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. आम्ही बिबट्याला शोधण्यासाठी थर्मल ड्रोनचा देखील वापर करत आहोत," असं जुन्नर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

सुजाता ढेरे असं पीडित महिलेचं नाव आहे. सुजाता ढेरे उसाच्या शेताभोवती असलेल्या सोयाबीनच्या शेतात पहाटे 6 वाजता काम करत होत्या. याचवेळी तिथे लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने ढेरेंना भक्ष्य समजून हल्ला केला आणि जवळपास 100 फूट फरफटत नेलं. परिणामी सुजाता ढेरे यांना गंभीर दुखापत झाली आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी झाले. ते तपास करत असून ढेरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या पिंपरी-पेंढार गावात ही घटना घडली. जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितलं की, मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू झाली असून स्थानिकांमध्ये जनजागृती करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

"पिंपरी-पेंढार गाव आणि परिसरात शोध आणि पकडण्याची मोहीम सुरू आहे. आम्ही ट्रॅप कॅमेरे, पिंजरे लावले आहेत आणि बिबट्याला शोधण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करत आहोत. आम्ही रहिवाशांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहोत आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा असा सल्ला त्यांना दिला आहे,” असं राजहंस यांनी सांगितलं. 

बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ

2001 पासून जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंची दुसरी सर्वात जास्त संख्या यानिमित्ताने नोंदवण्यात आली आहे. 2002 मध्ये सर्वाधिक 11 लोकांचा एका वर्षात अशा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला होता. "जुन्नरमध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे. बहुतेक बिबट्या घोड आणि कुकडी नद्यांच्या दरम्यान राहतात. ऊसाची शेतं त्यांच्यासाठी सुरक्षित निवासस्थान आहेत," असं एका वन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितले.

"मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, भक्कम धोरणात्मक निर्णय आणि लोकांचा पाठिंबा आवश्यक आहे. वनविभाग सतत रहिवाशांना सुरक्षा उपायांचे पालन करण्याचा सल्ला देतो, तरीही बरेच गावकरी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात," अशी खंत अधिकाऱ्याने व्यक्त केली.