Sharad Pawar On Ajit Pawar Change Chair: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार एकत्रितपणे सहभागी झाले होते. मात्र बैठकीला उपस्थित राहिलेल्या अजित पवारांनी स्थानापन्न होण्याआधीच शरद पवारांच्या खुर्चीच्या बाजूला असलेली आपली खुर्ची दूर केली आणि एक जागा सोडून ते बसले. याबद्दल आता शरद पवारांनी नेमकं काय घडलं याचं स्पष्टीकरण कोल्हापूरमध्ये पत्रकारपरिषदेमध्ये दिलं आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंचावर शरद पवार आणि अजित पवारांची खुर्ची बाजूबाजूला ठेवली होती. शरद पवार आणि अजित पवार आता बाजूबाजूला बसून काय बोलणार याबद्दलची चर्चा रंगली होती. मात्र संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि विश्वस्त अजित पवार यांची बैठक व्यवस्था शेजारी शेजारी असतानाच ऐन सभेच्या आधी त्यात बदल करण्यात आला. अजित पवार मंचावर आल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नावाच्या पाटीजवळ असलेली आपल्या नावाची पाटी बदलून घेतली. दोघांच्या खुर्च्यांमध्ये सहकार मंत्री बाबसाहेब पाटील यांची पाटी ठेवण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बघत अजित पवार यांनी आसन व्यवस्था बदलल्याची स्मितहास्य करत कल्पना दिली.
अजित पवारांनी केलेल्या या आदलाबदलीची चांगलीच चर्चा रंगली. यासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. "काल अजित पवार यांची खुर्ची बदललीचं कारण नवीन सहकार मंत्री आहेत. त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. म्हणून मीच म्हटलं मग माझ्या बाजूला बसा," असं उत्तर शरद पवारांनी दिलं.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच 'व्ही. एस. आय.'कडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची मागणी अजित पवारांनी आपल्या भाषणात केली. अजित पवारांची ही सूचना ऐकल्यानंतर आपल्या भाषणात शरद पवारांनी लगेच बक्षिसांची रक्कम वाढवत असल्याची घोषणा केली. 'व्ही. एस. आय.'कडून देण्यात येणाऱ्या 10 हजारांच्या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली. तसेच सर्वोत्कृष्ट कारखान्याला दिला जाणारा अडीच लाखाचा पुरस्कार यापुढे 5 लाखांचा करण्यात आला आहे. ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सल्ला देण्यासाठी व्हीएसआयकडून स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येईल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.