लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?

महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 11, 2024, 04:15 PM IST
लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय? title=

Atul Subhash Suicide Case: बंगळुरूचे सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, मृताने 24 पानांची सुसाइड नोट लिहीली, ज्यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबावर छळ केल्याचा आरोप केला. अतुलच्या या दुर्घटनेतून हे सिद्ध होते की, विवाहित पुरुषाचे आयुष्यही कठीण असू शकते. तेही नैराश्याला सामोरे जात असतील. 

नैराश्य ही एक गंभीर मानसिक स्थिती आहे. ज्यामुळे कोणतीही व्यक्ती त्रास देऊ शकते, मग तो पुरुष असो वा स्त्री. अनेकदा असे मानले जाते की, लग्नानंतर महिला अधिक मानसिक ताण सहन करतात, परंतु पुरुष देखील याला अपवाद नाहीत. खरं तर, विवाहित पुरुष देखील कधीकधी नैराश्याने ग्रस्त असतात, परंतु ते व्यक्त करताना थोडा विचार करतात. 

नैराश्याचे कारण

भारतातील प्रसिद्ध क्लिनिकल सायकोलॉजिस्ट टीपी जवाद यांचे मत आहे की, लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या पुरुषांवरही येतात. कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन करणे, पत्नी आणि मुलांच्या गरजा पूर्ण करणे, सामाजिक अपेक्षा पूर्ण करणे अशा अनेक दबावांचा त्यांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय पत्नीसोबत कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कायदेशीर लढाई असेल तर पुरुषांवर तणावाचा डोंगर कोसळतो. आणि याने पुरुष पुरता खचून जातो. 

पुरुष का मनातलं सांगत नाहीत?

पुरुषांचे नैराश्य लपवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे समाजात खोलवर रुजलेली पुरुषसत्ताक विचारसरणी. लहानपणापासूनच पुरुषांना शिकवले जाते की त्यांनी नेहमी 'स्ट्राँग' राहावे. त्यांना रडण्याची किंवा त्यांच्या भावना मांडण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत जेव्हा कोणतीही मानसिक समस्या उद्भवते तेव्हा ते त्याला कमजोरी समजतात आणि ते त्यांच्या मनात ठेवतात.

दुसरे कारण म्हणजे पुरुषांना असे वाटते की, त्यांनी त्यांच्या नैराश्याबद्दल बोलले तर समाज त्यांना गांभीर्याने घेणार नाही. कधीकधी त्यांना असेही वाटते की, त्यांचे बोलणे कुटुंबातील इतर सदस्यांना अस्वस्थ करू शकते. आपल्यामुळे टेन्शन नको या विचाराने पुरुष कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी मन मोकळं करत नाही. 

उपाय काय?

नैराश्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे ती स्वीकारणे. पुरुषांनी समजून घेतले पाहिजे की, भावना व्यक्त करणे ही कमजोरी नाही. मित्र, कुटुंब आणि जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेताना कोणतीही लाज बाळगू नये. समाजालाही आपली विचारसरणी बदलावी लागेल. पुरुषांना भावनिकदृष्ट्या असुरक्षित राहण्याची परवानगी समाडाने देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या लिंगाच्या आधारावर पाहू नयेत. तुमच्या आजूबाजूला एखादा विवाहित पुरुष डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसत असेल तर त्याच्याशी बोला आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो टोकाचा कोणताही निर्णय घेणार नाही.