चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत

Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 20, 2024, 10:51 AM IST
चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत  title=
Diwali 2024 How to Make the Perfect ,Bhajani chakli check perfect ingredients

Diwali 2024:  दिवाळी अगदी दोन आठवडयांवर येऊन ठेपली आहे. सर्व गृहिणींची फराळ बनवण्यासाठीची घाईगडबड सुरू आहे. फराळ बनवायचे म्हणजे त्याची तयारी आधीपासूनच केली जाते. फराळातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली. खुसखुशीत आणि खमंग चकली बनवणे म्हणजे परफेक्ट भाजणी घेतली पाहिजे. चकलीची भाजणी परफेक्ट झाली नाही तर चकली तेलात जाताच तुटण्याची किंवा विरघळण्याची शक्यता असते. 

चकली परफेक्ट बनवण्याआधी भाजणीचे माप कसे घ्यावे, याची माहिती जाणून घ्या. घरी बनवलेल्या चकल्या चविष्ट आणि चवदार लागतात. चकळीचे पीठ दळण्यापासून ते चकली तळ्यापर्यंत काय काय स्टेप असतात ते आज पाहूयात. 

भाजणीचे पीठ दळण्याची पद्धत

सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घ्या. तांदुळ सुकल्यानंतर ते एका कढाईत काढून मॉईश्चर निघेपर्यंत भाजून घ्या. 

नंतर तुमच्या मापानुसार, 1 वाटी चण्याची डाळ भाजून घ्या. नंतर अर्धी वाटी उडदाची डाळ तांदळाप्रमाणे स्वच्छ धुवून सुकवून घ्या आणि मंद आचेवर भाजून घ्या. त्याचप्रमाणे एक वाटी मुगाची डाळ भाजून एका ताटात काढून घ्या. 

एक वाटी पोहे भाजून घ्या. पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नंतर साबदाणेसुद्धा भाजून घ्या. पाव चमचा कच्चे धणे, जिरे, मेथीचे दाणे टाकून चांगले भाजून घ्या.

एक लक्षात ठेवा, जिरे जास्त वापरु नका. जिऱ्यामुळं चकलीला काळपट रंग येऊ शकतो. त्यामुळं चवीपुरते जिरे टाका. 

भाजणीचे सर्व साहित्य एकजीव करुन थंड होण्यासाठी ठेवून द्या. एकदा हे साहित्य थंड झाले की गिरणीतून दळून आणा. 

उकड काढून केलेली चकली

चकली करत असताना भाजपणीच्या पिठात वरतून गरम पाणी टाकले जाते. मात्र, तुम्ही भाकरीप्रमाणे भाजणीच्या पिठाची उकड घालूनही चकली करु शकता. 

तुम्ही 2 ते 3 वाट्या भाजणीचे पीठ घेतलं असेल तर 2 वाटी पाणी मोजून घ्या. आता एका भांड्यात पाणी घेऊन चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, ओवा, पांढरे तीळ आणि शेवटी पाव वाटी तेल घाला. पाण्याला चांगली उकळी येऊद्यात. 

पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन त्यात भाजणीचे पीठ घाला. नंतर लाटणी किंवा मोठ्या चमच्याने मिश्रण एकजीव करुन घ्या. नंतर पीठ एका ताटात काढून गरम असताचा मळून घ्या . हवं तर तुम्ही वाटी किंवा ग्लासचा वापर करु शकता. पीठ चांगले मळून घेतल्यानंतर चकल्या करायला घ्या.