'भाजप स्वबळावर सत्तेत येईल; शिवसेनेला ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत'

शिवसेनेत कोणीही उठतो आणि तोंडाला येईल ते बोलत सुटतो.

Updated: Oct 22, 2019, 04:20 PM IST
'भाजप स्वबळावर सत्तेत येईल; शिवसेनेला ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत' title=

कणकवली: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५० ते ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. तसेच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नारायण राणे शिवसेनेविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
 
त्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) निष्कर्षाशी सहमत नाही. भाजपला या निवडणुकीत १६४ पैकी १३५ जागांवर विजय मिळेल. त्यामुळे भाजप सहजपणे स्वबळावर सत्ता स्थापन करेल. याउलट शिवसेनेची मजल ५० ते ५५ च्या वर जाणार नाही, असे राणेंनी सांगितले.

यावेळी त्यांनी कणकवलीतील लढतीवरून शिवसेनेलाही लक्ष्य केले. कणकवली मतदारसंघाचा निकाल दोन दिवसांत स्पष्ट होईल. नितेश राणे याठिकाणी ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील. कणकवलीतील शिवसेनेच्या उमेदवाराला कोणी ओळखत तरी का, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.

तसेच शिवसेनेत कोणीही उठतो आणि तोंडाला येईल ते बोलत सुटतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचेही राणे यांनी सांगितले. 

त्यामुळे आता नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोमवारी मतदान पार पडल्यानंतर 'झी २४ तास' आणि 'पोल डायरी'ने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला २०१४ पेक्षा कमी जागा मिळणार असल्याची शक्यता समोर आली होती. गेल्या निवडणुकीत ६३ जागांवर जिंकलेल्या शिवसेनेची ५५ जागांपर्यंत घसरण होऊ शकते. ही शक्यता खरी ठरल्यास भाजपकडून लहान भाऊ म्हणून हिणवण्यात येणाऱ्या शिवसेनेवर नामुष्कीची वेळ ओढावेल.