Stock Market Rules: मागील दशकभराच्या काळामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, आता नोकरदार वर्गातूनही अनेक मंडळी शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. अशा सर्व मंडळींसाठी ही बातमी महत्त्वाची. कारण, 31 मार्चपासून या गुंतवणुकीसंदर्बभातील नियम बदलण्याचा निर्णय सेबीनं (SEBI) घेतला आहे.
नव्या नियमानुसार 31 जानेवारीपासून 500 वाढीव शेअरसाठी ट्रेडिंग एंड सेटलमेंटच्या T+0 मोडसाठी शेअर लिस्ट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या T+0 सेटलमेंट सायकल निवडक 25 शेअरपुरताच मर्यादित असतो. यामध्ये ONGC, SBI आणि बजाज ऑटोच्या शेअरचा समावेश आहे.
सेबीकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीच्या 500 शेअरची निवड 31 डिसेंबरच्या मार्केट कॅपच्या हिशोबानं करण्यात येईल. यानंतर दर महिन्याला पुढील 100 शेअर यादीत जोडण्यात येतील. 31 जानेवारी 2025 पासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होणार असून, T+0 सेटलमेंट सिस्टम अंतर्गत गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर आणि फंड त्याच दिवशी मिळतील, जेव्हा त्यांनी ट्रेडिंग केली आहे. शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये हा बदल करणारा भारत तूर्तास पहिलाच देश ठरत आहे.
T+0 सेटलमेंटचा थेट अर्थ शेअर खरेदी करणं आणि त्यांची विक्री करण्याच्या एकाच दिवसाशी संबंधित आहे. ज्या दिवसी शेअर खरेदी केले त्याच दिवशी तुम्हाला पैसे दिले जाणार असून, त्याच दिवशी तुमच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हे शेअर दिसू लागतील. अगदी याच पद्धतीनं ज्या दिवशी शेअरची विक्री केली त्याच दिवशी तुम्हाला त्याच्यासाठीची रक्कमही मिळेल.
सध्याच्या घडीला भारतात T+1 सेटलमेंट प्रक्रिया लागू असून, त्यानुसार T+1 (ट्रेडिंग+एक दिवसाचं) सेटलमेंट अशी यंत्रणा लागू आहे. जगभरातील अनेक शेअर बाजारांमध्ये T+2 सिस्टीम लागू असून, T+0 ही नवी प्रमणाली लागू करणारा भारत हा पहिलाच देश ठरत आहे. इथं गुंतवणूकदारांना T+0 किंवा T+1 मधील कोणत्याही एका पर्यायाची निवड करण्याची मुभा असेल.