Weather Forecast: संपूर्ण देशभरात सध्या थंडीचा मारा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. साधरण दोन दिवस थंडीनं उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा देशातील बहुतांश भागांमध्ये थंडी जोर धरताना दिसणार आहे. इतकंच नव्हे, तर देशातील काही भागांमध्ये पावसाची हजेरीसुद्धा असणार आहे. ज्यामुळं बदलणाऱ्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसेल. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 23 ते 29 जानेवारी या आठवड्याभरामध्ये हवामानाचे विविध रंग पाहायला मिळणार आहे. पश्चिमी झंझावात यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.
मैदानी क्षेत्रांमध्ये पश्चिमी झंझावातामुळं पावसाची हजेरी असणार आहे, तर पर्वतीय भागांना बर्फवृष्टीचा तडाखा बसणार आहे. याचे परिणाम म्हणून देशभरात पुन्हा एकदा थंडीची लाट सक्रीय होणार आहे.
देशात हिवाळ्यानं चांगलाच जोर धरलेला असताना आता काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेणं कधीही उत्तम असेल. आयएमडीच्या अंदाजानुसार राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार आहे. तर, तापमानातही लक्षणीय घट होणार आहे. दिल्ली आणि नजीकच्या भागात पावसाच्या तुरळक सरी बरसतील. उत्तर प्रदेशातही पुढील 24 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, हिमाचल प्रदेशातील चंबा, मंडी, कांगडा या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सदर भागांमध्ये पावसाच्या हजेरीनंतर तापमानात घट होणार आहे. ज्यामुळं नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दिल्लीमध्ये तापमान 8 अंशांपर्यंत असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर उत्तर प्रदेशात पारा 9 अंशांवर असेल.
तिथे देशभरात पाऊसधारा बरसण्याचा अंदाज असतानाच मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरीय भागामध्ये आठवडाभर थंडी कायम राहील असं सांगण्यात आलं आहे. किमान पुढील दोन दिवस मुंबईचं तापमान अपेक्षेहून कमीच असेल असं सांगत सकाळच्या वेळी धुरक्याचं प्रमाण जास्त असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यामध्ये हवेच्या गुणवत्तेमध्ये काही अंशी बदल झाले असून, नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू शकतात. ज्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.