मुंबई : गुरुवारी एकिकडे प्रेमाच्या दिवसाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच कोणालाही कल्पनाही नसेल अशा वेळी देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू- काश्मीर येथील पुलवामातील अवंतीपोरा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. जवान जात असणाऱ्या बसच्या ताफ्यावर एका कारने धडक देत हा आत्मघातकी हल्ला घडवून आणला आणि सीआरपीएफच्या ४४ जवानांना यात जीव गमवावा लागला. सैन्यदलावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात आला. प्रत्येक देशवासियाने या शदीहांच्या कुटुंबासोत आपण उभं असल्याची भावना व्यक्त केली. अशाच वातावरणात सोशल मीडियावर एक व्हि़डिओ या प्रसंगामुळे चर्चेत आला.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला होता. पण, एकिकडे सैन्यावर असे आघात होत असतानाच दुसरीकडे 'आर्मी म्हणजे काय?', असं सांगणाऱ्या या चिमुरडीचा हा व्हिडिओ डोळ्यांच्या कडा ओलावून गेला. २०१६ मध्ये जम्मू- काश्मीरच्या नगरोटा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या, मुळच्या बंगळुरूच्या मेजर अक्षय गिरीश यांची ही मुलगी. आपल्या वडिलांनी जी शिकवण दिली होती, त्याचीच आठवण करत ती मोठ्या निरागसतेने ही शिकवण सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. मेजर गिरीश यांच्या पत्नीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
A year after Akshay's martyrdom, Naina recollects conversations with her papa.
Here she teaches us what 'Army is...'
This random video captures innocence and faith.
Love is an emotion.
Her papa's love for the Army and Countrymen also stays within her.
Jai Hind. @adgpi pic.twitter.com/kWecbp1Tax
— Meghna Girish (@megirish2001) February 11, 2019
मेजर गिरीश शहीद झाले त्यावेळी त्यांची मुलगी, नैना ही जवळपास अडीच वर्षांची होती. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हि़डिओचं कॅप्सन वाचता तो काही वर्षांपूर्वी चित्रीत करण्यात आल्याचं लक्षात येत आहे. ज्यामध्ये ती आर्मी म्हणजे काय... हे तिला समजवण्यात आलं तसं मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 'आर्मी आपल्याला प्रेम करायला शिकवते. आर्मी वाईट लोकांशी लढते. आर्मी आपल्या मदतीसाठीच आहे. आर्मी प्रत्येकालाच जय हिंद करते', असं लहानगी नैना या व्हिडिओत म्हणत आहे. नैनाचा हा व्हिडिओ पाहताना तिला गवसलेला आर्मीचा अर्थ पाहताना नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात.