लखनऊ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Elections 2022) सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यात भाजपनं आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. भाजपनं या पहिल्या यादीत 107 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. (uttar pradesh elections 2022 bhartiya janta Party release first list of candidates for assembly elections 2022)
भाजपने जाहीर केलेल्या 107 जणांपैकी 63 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर 20 विद्यमान विधानसभा सदस्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे 107 ठिकाणी 83 आमदार हे इच्छूक होते. मात्र त्यापैकी 63 जणांनाच पुन्हा उमेदवारी मिळवण्यात यश आलं.
मुख्यमंत्री योगी कुठून निवडणूक लढवणार?
यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ आयोध्येमधून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र योगींनी पुन्हा एकदा गोरखपूरमधूनच निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रयागराजच्या सिराथू विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
काँग्रेसकडून पंजाबसाठी पहिली यादी
दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेही पंजाब विधानसभा निवडणुकींसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 86 जणांना उमेदवारी दिली आहे. पंजाबच विद्यमान मुख्यमंत्री चमकौर साहिबमधून तर प्रेदेशाध्यक्ष अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून नशिब आजमवणार आहेत.
सोनू सूदच्या बहिणीला तिकीट
काँग्रेसने अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूदलाही उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने काही विद्यमान मंत्र्यांना तिकीट न देता थेट त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय किती योग्य ठरेल, हे निवडणुकीच्या वेळेसच स्पष्ट होईल.
यूपी आणि पंजाबमध्ये निवडणुका कधी?
उत्तर प्रदेशमध्ये 7 पंजाबमध्ये 1 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर यूपीमध्ये 14 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधी दरम्यान एकूण 7 टप्प्यांमधील मतदान होईल. पंजाबमध्ये एकूण 117 तर यूपीमध्ये सर्वाधिक 403 विधानसभा मतदारसंघ आहेत.