भारतातील 'या' गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

Travel News : प्रवास करणं आपल्याला समृद्ध करून जातं. हे फक्त वाचूनच लक्षात येणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रवासाचा अनुभवत घ्यावा लागेल. 

सायली पाटील | Updated: Oct 18, 2023, 04:23 PM IST
भारतातील 'या' गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव  title=
travel Himachal Pradesh Mysterious Malana Village And Marijuana tradition

Travel News : सध्याची पिढी प्रवासाला प्राधान्य देणारी आहे. पण, या पिढीपर्यंत प्रवासाचं महत्त्वं पोहोचवणाऱ्या जुन्या पिढीतील मंडळींनीही अशा काही ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत आणली जी पाहून आपण अवाक् झालो. भारतातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे (Himachal Pradesh) हिमालच प्रदेशातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव. एक असं गाव जिथं गेलं असता तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आहात याचीच अनुभूती तुम्हाला होते. या गावाचा इतिहास तुम्हाला बराच मागे नेतो. 

इतिहासात डोकावताना... 

सिकंदर या युनानचा एक मोठा राजा होता. त्यानं फार कमी वयात जगातील बहुतांश भागावर राज्य केलं होतं. सिकंदरच्या वाट्याला आलेलं यश इतकं, की सर्वचजण त्याला महान म्हणू लागले. अशा या सिकंदर राजाचा वंश पुढे वाढला का? आता ती मंडळी कुठं आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही शोधत असला तर भारतात तुम्हाला त्याचे संदर्भ मिळू शकतात. थट्टा नाही, पण हिमाचल प्रदेशात एक असं गाव आहे जिथले नागरिक सिकंदरचे वंशज असल्याचा दावा केला जातो. 

असं म्हणता की सिकंदरचे सैनिक याच गावात थांबले होते. तेच त्याचे वंशज होते. असं असलं तरीही ग्रीक भाषा आणि मलाणामध्ये प्रचलित असणारी कनाशी भाषा यांमध्ये मात्र साधर्म्य आढळत नाही. कनाशी भाषेमध्ये संस्कृत आणि तिबेटन भाषेता मिलाप आढळतो. 

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल

 

हिमाचल प्रदेशातील पार्वती नदीच्या खोऱ्या वसलेलं, चारही बाजूंनी पर्वतांचा वेढा असणारं आणि साधारण 1700 लोकसंख्या असणारं हे गाव आहे मलाणा. असं म्हणतात की मलाणा हे जगातील सर्वात जुनं लोकशाही असणारं गाव आहे. इथं असणारं एक प्रधान मंडळ जमलू ऋषींचा (पौराणिक देवता) आदेश प्रमाण मानतात. याच प्राधान मंडळाचा निर्णय इथं अंतिम असतो. सहसा देशात लागू असणारे कायदे इथं लागू नसले तरीही काळ पुढे आला तसतसं गावातील चित्र काही अंशी बदललं. 

पर्यटकांचा स्पर्श वर्ज्य 

मलाणामध्ये पर्यटकांच्या येण्याचा आकडा मोठा आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे इथं मिळणारा गांजा. जगातील सर्वाधिक मागणी असणारा गांजा इथंच मिळतो असं म्हटलं जातं. म्हणूनच अनेक पर्य़टकांच्या मते मलाणा म्हणजे एक वेगळी दुनिया. 

पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलं तरीही या गावात पर्यटकांना मंदिरांना किंवा तेथील वस्तूंना स्पर्श करण्याची परवानगी नाही. असं केल्यास त्यांना 1500 रुपयांचा दंड भरावा लागतो. येथील गावकऱ्यांच्या मते गावाबाहेरील मंडळी अपवित्र असतात. त्यामुळं चुकूनही बाहेरील व्यक्तीनं येथील मंदिरं, वस्तूंना स्पर्श केला तर त्यांना दंड भरावा लागतो. या रकमेतून प्राणी खरेदी करत देवाच्या नावे बळी दिला जातो असंही सांगण्यात येतं. 

गावापर्यंतचा प्रवास खडतर... 

मलाणापर्यंत पोहोचणंही फार कठीण. इथं येताना आपण एका वेगळ्याच दुनियेच्या सफरीवर निघालो आहोत असं वाटू लागतं. या गावात पक्का रस्ता नाही. पर्वतांमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या वाटांतूनच तुम्हाला पुढे जावं लागतं. पार्वती नदीच्या खोऱ्यातून तलहटीस्थित जरी गावातून इथं पोहोचण्यासाठी एक उभा चढ आहे. जिथं येईपर्यंत तुम्हाला चार तासांचा कालावधी लागतो. मलाणामध्ये तुम्हाला हिमाचलच्या इतर भागांप्रमाणं मनमोकळया गप्पा मारणारी मंजळी तशी कमीच दिसतील. अशा या रहस्यमयी गावाला शक्य असल्यास नक्की भेट द्या, पण तेथील नियम पाळा.