10,00,00,00,00,000 एवढ्या रकमेचा चुराडा! अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठा भूकंप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत अनिश्चित भूमिका पहायला मिळत आहे.  याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 11, 2025, 04:06 PM IST
10,00,00,00,00,000 एवढ्या रकमेचा चुराडा! अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठा भूकंप title=

Stock Market Crash:  अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठा भूकंप आला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होऊन एका झटक्यात  10 लाख कोटींचा चुराडा झाला आहे. अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25 टक्के आयात शुल्क लादल्यामुळे याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळाला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत अनिश्चित भूमिका पहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे.  जागतिक स्तरावर पुन्हा एकदा नवीन व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

ट्रम्प यांनी अॅल्युमिनियमवरील कर 10 टक्क्य्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याच वेळी, स्टीलवर 25 टक्के कर पुन्हा लादण्यात आला. कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझील सारख्या देशांना देण्यात आलेल्या सूट देखील रद्द करण्यात आली आहे.  निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर दबाव वाढेल आणि जागतिक शेअर बाजारात आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकतो अशी दहशत गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. यापूर्वी कोणत्याही शुल्काशिवाय अमेरिकेत  स्टील आणि अॅल्युमिनियम उद्योग करता येत होता. 

अमेरिकेच्या निर्णयामुळे शेअर बाजार क्रॅश झाला आहे. पॉवर ग्रिड, झोमॅटो, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फिनसर्व्ह हे सुरुवातीच्या काळात घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी सर्वात मोठी घसरण झोमॅटोच्या शेअर्समध्ये पहायला मिळाली. झोमॅटोचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. अपेक्षेपेक्षा कमी तिमाही निकाल आल्यानंतर आयन मोटर्सचे शेअर्स जवळपास 7 टक्क्यांनी घसरले. दरम्यान, Nykaa चे शेअर्स 3 वाढले कारण कंपनीचा निव्वळ नफा 61 टक्के वाढून 26.12 कोटी रुपये झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण पहायला मिळाली. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरला. एस अँड पी 500 फ्युचर्समध्येही 0.2 टक्क्यांनी घट झाली. युरो स्टॉक्स 50 फ्युचर्समध्येही घसरण झाली. दरम्यान, अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे आणि सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. या अनिश्चित वातावरणात, गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक आश्रयस्थानांकडे झुकले आहेत.

ऑटो, रिअॅलिटी आणि फार्मा शेअर्समधील एकूणच घसरणीमुळे आज शेअर बाजारावरही दबाव निर्माण झाला. विशेषतः, कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल आणि भविष्यातील वाढीबद्दल वाढत्या चिंता यामुळे ही घसरण आणखी वाढली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूकदारांची पीछेहाट पहायला मिळत आहे.