डिसेंबरपासून सुरू होणार राम मंदिर निर्माण, महंतांची घोषणा

'परस्परसंमतीनं राम मंदिर अयोध्येत आणि मस्जिदचं निर्माण लखनऊमध्ये होणार'

Updated: Nov 3, 2018, 02:21 PM IST
डिसेंबरपासून सुरू होणार राम मंदिर निर्माण, महंतांची घोषणा  title=

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणावर भाजपचे माजी खासदार आणि रामजन्मभमी न्यासचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय. वेदांती यांनी राम मंदिर निर्माणाचं कार्य डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची घोषणाच करून टाकलीय. 'कोणत्याही अध्यादेसाशिवाय अयोध्येत राम मंदिराचं निर्माण होईल. परस्परसंमतीनं राम मंदिर अयोध्येत आणि मस्जिदचं निर्माण लखनऊमध्ये करण्यात येईल' असं वक्तव्य राम विलास वेदांती यांनी केलंय. दिल्लीतील तालकतोरा स्टेडिअममध्ये साधूसंतांच्या दोन दिवसीय बैठकीला सुरूवात झालीय. या बैठकीवेळी वेदांती यांनी ही माहिती दिलीय.

असं वक्तव्य करण्याची वेदांती यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अयोध्येत राम मंदिर बनवण्याची वेळ निश्चित झाल्याचं सांगितलं होतं. भाजपनं अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग काढलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच राम मंदिर बनवण्याचं काम सुरू होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

दरम्यान, अयोध्येच्या वादग्रस्त रामजन्मभूमीवर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रतिक्रिया देताना, हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं उत्तरप्रदेशचे सत्ताधारी योगी सरकार आणि केंद्र सरकार काही करू शकत नाही, असं म्हटलं होतं.