Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Inauguration: 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे. दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असतील. त्यामुळे राजकारणातील सर्व दिग्गज अ. भा. साहित्य संमेलनाच्या मंचावर एकत्र दिसणार आहे. 21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ.तारा भवाळकर या भूषवणार आहेत. देशाच्या राजधानीत (Delhi News) तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल.
संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत दुसरे उद्घाटन सत्र होणार आहे. सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हे सत्र पार पडेल. संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत निमंत्रितांचे कविसंमेलन असेल.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, 22 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत होईल. याशिवाय, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि ‘मधुरव’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच यशवंतराव चव्हाण सभामंडपात ‘बहुभाषिक कवी संमेलन’ आणि ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे याशिवाय माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे असे अनेक मोठे नेते महाराष्ट्रातून संमेलनात उपस्थिती दाखवणार आहेत.