Prashant Kishore: "10 वी नापास मुलाला CM बनवण्याची लालू प्रसाद यादव यांना चिंता पण..."; प्रशांत किशोर यांचा टोला

Prashant Kishore Targets Lalu Prasad Tejashwi Yadav On Employment Issue: आपल्या पदयात्रेदरम्यान प्रशांत किशोर यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.

Updated: Feb 4, 2023, 08:58 PM IST
Prashant Kishore: "10 वी नापास मुलाला CM बनवण्याची लालू प्रसाद यादव यांना चिंता पण..."; प्रशांत किशोर यांचा टोला title=
prashant kishor lalu prasad yadav tejashwi

Prashant Kishore Targets Lalu Prasad Tejashwi Yadav On Employment Issue: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना लक्ष्य केलं आहे. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा 10 वी पास नसतानाही त्यांना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री बननणार की नाही याची चिंता आहे. त्यांना अशी चिंता वाटते याबद्दल काही अडचण नाही. लालूजींना त्यांच्या मुलाची चिंता वाटणे सहाजिक आहे पण त्यांना बीए-एमए झालेल्यांना शिपायाची नोकरीही मिळत नाही याची चिंता वाटत नाही ही चिंतेची बाब आहे, असा टोला किशोर यांनी लगावला आहे.

जनता सगळं विसरुन जाते

शनिवारी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्र्यांचा मतदरासंघ असलेल्या गोपालगंज जिल्ह्यामध्ये बोलताना हे विधान केलं. गोपालगंजमधील चैनपट्टी गावामध्ये जनसंवाद कार्यक्रमादरम्यान स्थानिकांशी संवाद साधताना तुम्ही तुमच्या मुलांची चिंता केली नाही तर जगात इतर कोणीही तुमच्या मुलांची चिंता करणार नाही असं सांगितलं. पाच वर्ष जनता शिक्षण आणि रोजगारासंदर्भात चर्चा करते. मात्र मतदानाच्या दिवशी जनता हे सर्वकाही विसरुन जाते, अशी खंतही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली. 

जात आणि धर्माच्या नशेत हरवला आहात

मतदान करताना जात आणि धर्माच्या नावाखाली मतदान केलं जातं. ज्यांना जातीच्या आधारावर मत मिळत नाही त्यांना हिंदू, मुस्लीम, चीन-पाकिस्तान आणि पुलवामाच्या नावाखाली मतं मागितली जातात आणि दिली जातात, असं प्रशांत किशोर म्हणाले. तुम्ही सर्वजण जात आणि धर्माच्या नशेत हरवला आहात, असं सांगताना प्रशांत किशोर यांनी तुम्हाला तुमच्या मुलांची चिंता असती तर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी करणाऱ्याला निवडून दिलं असतं, असं म्हटलं. प्रशांत किशोर यांनी स्थानिकांना मतदान करताना आपल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं.

21 दिवसांची पदयात्रा

प्रशांत किशोर यांनी गोपालगंजमध्ये सुरु केलेल्या पदयात्रेचा शनिवारी 21 वा आणि शेवटचा दिवस होता. आपल्या पदयात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या गावांमध्ये गेले आणि त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्याचं आश्वासन स्थानिकांना दिला आहे. शेवटच्या दिवशी आपल्या पदयात्रेदरम्यान किशोर यांनी चार सभांना संबोधित केलं. प्रशांत किशोर यांनी आपल्या 21 दिवसांच्या दौऱ्यांदरम्यान 6 पंचायत आणि 13 गावांमधील बऱ्याच समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी या पदयात्रेदरम्यान 19.3 किलोमीटर अंतर कापलं. आता किशोर यांच्या या टीकेवर राष्ट्रीय जनता दलाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.