PM Modi Praises ED Work Against Corruption: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख करुन वारंवार विरोधीपक्षांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला तशास तसं उत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीतील अनेक घटक पक्षांनी केला आहे. याच टीकेला पंतप्रधांनी एका मुलाखतीमध्ये खास त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदींनी 'एशियानेट'ला दिलेल्या मुलाखतीत सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच ईडी आणि सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या कारवायांसंदर्भात भाष्य केलं आहे. मोदींनी ईडीकडून दाखल होणारी 97 टक्के प्रकरण बिगरराजकीय व्यक्तींविरोधातील असल्याचं या मुलाखतीत सांगितलं. तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी एका ईमानदार व्यक्तीला घाबरण्याची काहीच गरज नसते. मात्र भ्रष्टाचारात सहभागी झालेल्यांना पाप केल्याची भिती असते, असा उल्लेख करत सूचक पद्धतीने विरोधकांवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे, भ्रष्टाचाराने देशाला उद्धवस्त केलं आहे. या समस्येला संपूर्ण ताकदीने तोंड देण्याची गरज आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
एवढ्यावरच न थांबता पंतप्रधान मोदींनी त्यांचं सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराविरोधातील ईडी, सीबीआयच्या कारवाया वाढल्या असल्याचं नमूद केलं आहे. पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीमध्ये ईडीसंदर्भातील आकडेवारीचा उल्लेख करत सविस्तर माहिती दिली. "2014 च्या आधी ईडीने 1800 प्रकरणं दाखल केली होती. त्यानंतर भ्रष्टाचाराविरोधात या केंद्रीय यंत्रणेनं 5 हजारांहून अधिक प्रकरणं आपल्या हाती घेतली आहे. यामधून ईडी किती तत्पर यंत्रणा आहे हे दिसून येत आहे," असंही मोदी म्हणाले.
नक्की वाचा >> 'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य
ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांनी 2014 पासून आजपर्यंत 7000 ठिकाणी छापेमारी केली. त्यापूर्वी हा आकडा केवळ 84 इतका होता, असंही पंतप्रधान मोदींनी आवर्जून सांगितलं. पंतप्रधान मोदींनी 2014 नंतर 1.25 लाख कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, असंही सांगितलं. मागील आठवड्यामधील एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, मागील एका दशकात देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढण्यात ईडीने बजावलेल्या भूमिकेबद्दल भाष्य केलं होतं. तसेच त्यांनी ईडीच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी या केंद्रीय तपास यंत्रणेचं कौतुकगही केलं होतं. पुन्हा एकदा अशाचप्रकारे थेट आकडेवारी समोर ठेवत मोदींनी ईडीची कामगिरी मागील 10 वर्षांमध्ये बरीच कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे.