नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा Coroanvirus वाढता प्रादुर्भाव आणि गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांना देशवासियांशी संवाद साधला. Mann Ki Baat 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आत्मनिर्भर भारत, भारतीय अर्थव्यवस्था, अनलॉकनंतरचा देश आणि भारत-चीन तणाव अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ८ ठळक मुद्दे खालीलप्रमाणे
* भारत जशी मैत्री निभावतो त्याचप्रमाणे वेळ पडल्यास समोरच्याच्या नजरेला नजर कशी भिडवायची आणि त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारताला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० भारतीय सैनिकांनी ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली. देशासाठी बलिदान देण्याची सैनिकांची ही भावनाच देशाची खरी ताकद आहे.
* देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक क्षेत्रातील नव्या संधी अनलॉक झाल्या आहेत. अंतराळ, खाणकाम आणि कृषी क्षेत्रात भारतीयांसाठी संधीची नवी कवाडे खुली झाली आहेत. यामुळे 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला मोठी गती मिळेल. देशातील खाणक्षेत्र अनेक वर्षांपासून लॉकडाऊन होते. मात्र, व्यावसायिक लिलावाला मंजुरी दिल्यानंतर या क्षेत्राचा चेहरामोहरा पालटल्याचे मोदींनी सांगितले.
* कोरोनामुळे देश अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर आता आपण अनलॉकच्या टप्प्यात आहोत. या काळात कोरोनाला हरवणे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे, ही आपली प्रमुख उद्दिष्टं आहेत. या काळात मास्क न वापरण्याची किंवा फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्याची बेफिकिरी दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
* या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना भारतातील पारंपरिक खेळांचे स्टार्टअप सुरु करण्याचे आवाहन केले. या खेळांना लोकप्रिय करता येईल. त्यासाठी घरातील मोठ्या लोकांना त्यांच्या काळातील पारंपरिक खेळांविषयी विचारा, असा सल्ला मोदींनी बच्चेकंपनीला दिला.
* कोरोनाच्या जगभरातील प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मसाल्याच्या पदार्थांची मागणी वाढत आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मसल्यांचे पदार्थ उपयुक्त आहेत. भारतात मसाल्याच्या पदार्थांचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. त्यामुळे आता आपल्याला जगाला याचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. या माध्यमातून भारताचा व्यापार वाढू शकतो, असे मोदींनी सांगितले.
* आपल्या कृषी क्षेत्रातील अनेक गोष्टी लॉकडाउनमध्ये अडकल्या होत्या. हे क्षेत्र देखील अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्याना आपले पीक कुठेही आणि कुणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
* स्वातंत्र्यपूर्व काळात संरक्षण क्षेत्रात भारत आघाडीवर होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर आपल्याला या क्षेत्रातील संधींचा फायदा उठवता आला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षात भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल.
* आव्हाने येत राहतात. एका वर्षात एक आव्हान समोर येवो किंवा ५० आव्हाने येवोत. यामुळे वर्ष व्यर्थ जात नाही. भारताचा इतिहास आव्हानांनी भरलेला आहे. शेकडो आक्रमकांनी आमच्या देशांवर हल्ले केले. यामुळे भारत अधिक भव्य बनला.