प्रियांका गांधींच्या रॅलीनं काही फरक पडणार नाही - योगी आदित्यनाथ

२०१९ सालीही लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय

Updated: Feb 6, 2019, 04:12 PM IST
प्रियांका गांधींच्या रॅलीनं काही फरक पडणार नाही - योगी आदित्यनाथ title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या लढाईत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालच्या मैदानात उतरलेत. मंगळवारी ५ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या रॅलीनंतर लखनऊला परतलेल्या आक्रमक प्रचार आणि मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी वाद निर्माण करण्यासाठी टीएमसीनं हा सगळा कट रचल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी लखनऊमध्ये ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्या रोड शोवरही निशाणा साधलाय. तसंच प्रियांकाच्या रॅलीमुळे कोणताही फरक पडणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 

प्रियांका या काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्यांना आपला कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. परंतु, असे कार्यक्रम केल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असं म्हणतानाच २०१९ सालीही लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

'झी न्यूज'शी बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधलाय. 'या लोकांचे आचार-विचार किती भिन्न आहे हे त्यांच्या वागणुकीतून दिसतं. ३ आणि ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. टीएमसीनं हॅलीपॅडजवळ कार्यक्रम आयोजित करून कट रचून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला... पण आम्ही मात्र असं करणार नाही. ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशात आल्या तर त्यांचं स्वागतच असेल. आम्ही सर्वांनाच कुंभमेळ्याचं आमंत्रण दिलंय', असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. 

पश्चिम बंगालमध्ये अराजकता पसरलीय. सरकारी योजनांद्वारे लूट सुरू आहे. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचू दिल्या जात नाहीत. पश्चिम बंगालच्या ज्या भूमीनं लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, जिथं रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी झाले तिथं आज टीएमसीनं धुमाकूळ माजवलाय. पश्चिम बंगालमध्ये आत्तापर्यंत १०० हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या झालीय, असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला.

तृणमूल काँग्रेसचा उलट पाढा सुरू झालाय. महागठबंधनच्या निमित्तानं संविधान पायदळी तुडवणारे एकत्र येत आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली.