नवी दिल्ली : तिहाड कारागृहात निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना मृत्यू दंडाची शिक्षा दिली जाणार आहे. यासाठी फास तयार करण्यात आल्याचं देखील कळतं आहे. निर्भयाच्या या चारही गुन्हेगारांना एकत्रच फाशी दिली जाणार आहे. आता तिहाड कारागृह एकसोबत ४ फाशी देणारं पहिलं कारागृह ठरणार आहे. याआधी येथे फक्त एकच ठिकाणी फाशी देण्याची व्यवस्था होती.
तिहाड कारागृहात फाशी देण्यासाठी ४ जागा तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे काम करण्यासाठी कारागृहात जेसीबी देखील आणली गेली होती. जेसीबी मशीनच्या मदतीने या ३ नव्या जागा तयार करण्यात आल्या. या ठिकाणी भुयार देखील तयार केलं गेलंय. फाशी दिल्यानंतर या भुयारातूनच मृत शरीर बाहेर काढलं जातं.
६ डिसेंबर २०१२ मधील निर्भया सामूहिक बलात्कारात दोषी असलेल्या ४ आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. अक्षय, पवन, विनय आणि मुकेश या चार ही आरोपींच्या नावाचं डेथ वॉरंटवर ७ जानेवारीला पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे.
१९ डिसेंबरला दोषींची पूर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. यानंतर एक महिन्याच्या आत क्यूरेटिव अर्ज करण्याचा पर्याय आरोपींकडे असतो. त्यानंतर दया याचिका करण्याचा पर्याय असतो. पण निर्भया प्रकरणात आरोपींना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कोणत्याही क्षण या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते.