फेसबुकवरून कोणाच्या प्रेमात पडू नका नाहीतर...

समोरच्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती असल्याशिवाय आणि कुटुंबियांना विश्वासात घेतल्याशिवाय काही करणे महागात पडू शकते.

Updated: Dec 21, 2018, 09:42 AM IST
फेसबुकवरून कोणाच्या प्रेमात पडू नका नाहीतर... title=

मुंबई - पाकिस्तानमधून सुटका झालेला भारतीय नागरिक हमीद अन्सारी याने मायदेशी परतल्यावर देशातील तरुणांना उद्देशून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया साईटवरून कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. त्याचा शेवट प्रत्येकवेळी गोड होईलच असा नाही. पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगून झाल्यावर हमीद अन्सारीची दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून सुटका करण्यात आली. वाघा बॉर्डरमार्गे हमीद भारतात परतला. गुरुवारी त्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली.

सध्या अनेक तरुण विविध सोशल मीडिया साईट्सवर सक्रिय असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन यासह विविध साईट्सवर तरुण किंवा तरुणी अनोळखी व्यक्तींच्याही संपर्कात येतात. यातून पुढे ओळख वाढते आणि मग काही जण एकमेकांच्या प्रेमातही पडतात. पण समोरच्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती असल्याशिवाय आणि कुटुंबियांना विश्वासात घेतल्याशिवाय काही करणे महागात पडू शकते. 

मुंबईत 'झी न्यूज'शी बोलताना हमीद अन्सारी म्हणाला, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईट्सवरून कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांशी कधीच खोटं बोलू नका. जे काही घडले ते सगळं खरं खरं त्यांना सांगा. त्याचबरोबर कोणत्याही अनोळखी देशात गैरमार्गांनी प्रवेश करू नका, या सर्वाचा शेवट वाईट होण्याची शक्यताच जास्त असते. 

अन्सारीची फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. तो तिच्या प्रेमात पडला. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो आतूर झाला होता. त्यासाठी त्याने आपल्याला अफगाणिस्तानात काम मिळाल्याचे घरच्यांना सांगितले आणि तो तिला भेटण्यासाठी पहिल्यांदा अफगाणिस्तानला आणि तिथून बनावट पासपोर्ट काढून पाकिस्तानात पोहोचला. त्याचा हा अवैध प्रवास पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या रडावर आला. त्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपखाली अटक केली. त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.