भोपाळ : मंगळवारी पहाटे एका बंद घराच्या स्नानगृहातून महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे भोपाळच्या अयोध्या नगरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह सुमारे पाच दिवसांपूर्वीचा आहे. या मृत महिलेच्या गळ्यावर एक खूण आढळली आहे. ज्यामुळे तिचा गळा आवळून खून केला असल्याटी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे त्यानंतर त्यांनी या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राखी उर्फ राजकुमारी ही तिच्या पती प्रशांत आणि दोन मुलांसोबत अयोध्या नगरातील घर क्रमांक 17 गणपती होममध्ये राहत होते. राजकुमारी एका खासगी कंपनीत मार्केटींगचे काम करायची. तिचा नवरा एका वेगळ्या फर्ममध्ये मार्केटींगचे काम करतो. अनेकदा दोघांनाही कामाच्या निमित्ताने शहराबाहेर जावे लागत असे.
अशावेळी प्रशांत दोन्ही मुलांना गौरतगंज येथे त्याच्या कुटूंबीयांच्या घरी सोडत असे. त्या दिवशीही तसेच घडले. प्रशांतला ग्वाल्हेरला जावे लागणार होते आणि पत्नीला कामानिमित्त दिल्लीला जावे लागले. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना गौरतगंजमध्ये सोडले.
सोमवारी बंद घरातून गणपती होममध्ये राहणाऱ्या लोकांना घाण वास येऊ लागला. काहीतरी अघटीत घडलं असल्याचा अंदाज आल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की, या घराला बाहेरून कुलूप लावले गेले आहे.
प्रशांतच्या घरातील सदस्यांना बोलवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. त्यानंतर आत गेल्यानंतर त्यांना बाथरूममध्ये राजकुमारीचा मृतदेह पडलेला दिसला.
पोलिसांनी सांगितले की, महिलेचा पतीही सध्या बेपत्ता आहे. त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. पोलिस राजकुमारीच्या पतीचा शोध घेत आहेत.
पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे की, यातून काही वेगळा अँगल निघत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. परंतु हे सगळ प्रशांतचा शोध घेतल्यानंतरच समोर येईल.