पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट... कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील दोषी पुन्हा गजाआड

वायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये रफीक पंतप्रधान मोदींच्या हत्येप्रकरणी संभाषण करताना आढळला... 

Updated: Apr 24, 2018, 09:08 PM IST
पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट... कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील दोषी पुन्हा गजाआड title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आलीय. मोहम्मद रफीक असं या इसमाचं नाव आहे. मोहम्मद रफीक आणि ट्रक कॉन्ट्रक्टर असलेल्या प्रकाश नावाच्या एका व्यक्तीची एका ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर वायरल झाली होती... याची चौकशी करताना रफीक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपाखाली या इसमाला अटक करण्यात आलीय. 

मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोहम्मद रफीक याला मंगळवारी अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयीन मॅजिस्ट्रेट आर पांडे यांच्या न्यायालयासमोर सादर केलं. न्यायालयानं त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. वायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये रफीक पंतप्रधान मोदींच्या हत्येप्रकरणी संभाषण करताना आढळला. 

रफीक आणि प्रकाश यांची एकमेकांशी पैशांची काहीतरी घेवाण-देवाण होती. या मुद्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा दोघांचा प्रयत्न सुरु होता. याच दरम्यान रफीकनं आपण पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचं फोनवर म्हटलं होतं. आपण तमिळनाडूचे सर्व तुरुंग पाहिलेत, अशा फुशारक्या मारतानाही रफीक या ऑडिओ क्लीपमध्ये आढळतो. 

रफीकचं स्पष्टीकरण

अटकेनंतर मात्र रफीकचा सूर बदलला. आपण केवळ प्रकाशला घाबरवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचं त्यानं म्हटलंय. अशा प्रकारच्या कोणत्याही कटात आपण सहभागी नसल्याचंही त्यानं पोलिसांना सांगितलंय. 

कोईम्बतूर बॉम्बस्फोटात सहभाग

रफीक 1998 साली कोईम्बतूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आहे. या स्फोटात जवळपास 58 जणांचा मृत्यू झाला होता. तर करोडोंच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. 

रफीक 2007 साली शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडला होता. परंतु, तो कायमच पोलिसांच्या रडारवर राहिलाय. कारण, यानंतरही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत.