तमिळनाडू : नोटबंदी केल्याच्या तब्बल चार वर्षांनंतर एका दृष्टिबाधित दांम्पत्याकडे 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा आढळल्याचं समोर आलं आहे. या पती-पत्नीने 500 आणि 1000च्या एकूण नोटा मिळून 24 हजार रुपये जमवले होते. मात्र या जुन्या नोटा असल्याने या दोघांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
हे दृष्टिबाधित पती-पत्नी इरोड जिल्ह्यात अगरबत्ती विकण्याचं काम करतात. सुदूर पोठिया मूपानूर गावचे रहिवासी सोमू (58) यांनी दावा केला आहे की, शुक्रवारी आपली आणि आपल्या पत्नी पलानीअम्मल यांची बचत रक्कम बँकेत जमा करणयासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीबाबत माहिती मिळाली असल्याचं ते म्हणाले.
कोरोना व्हायरसमुळे गेल्या चार महिन्यात कोणतीही कमाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे आपल्या निरक्षर आईकडे ठेवण्यासाठी दिलेली बचत रक्कम काढण्यात आली, असं शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
आईकडे ठेवण्यासाठी दिलेली रक्कम घेऊन सोमू बँकेत जमा करण्यासाठी गेले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना या नोटा काही वर्षांपूर्वीच बंद झाल्याचं सांगितलं. सोमू यांनी सांगितलं की, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मिळून जवळच्या अंथियूर आणि आसपासच्या भागात दहा वर्षाहून अधिक काळापर्यंत अगरबत्ती आणि कापूर विकून ही रक्कम, जमापुंजी केली होती. अगरबत्ती आणि कापूर विकून आलेल्या पैशातून, ते दर आठवड्याला त्यांच्यासोबत राहणाऱ्या आईला काही रक्कम बचतीसाठी देत होते. ते पैसे त्यांची आई सुरक्षित ठेवत होती.
आम्हाला तिघांनाही 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्याबाबत माहित नव्हतं. याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांना निवेदन पाठवून मदतीची विनंती केली असल्याचं सोमू यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी करण्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.