Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा दर दिवशी वाढतच चालला आहे. दर दिवसागणिक रेल्वेच्या कार्यपद्धतीमध्ये नवनवीन गोष्टींचीही जोड मिळत आहे. त्यामध्ये प्रवासासाठीची तिकिटं बुक करण्याच्या पद्धतीतही काही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुळात कधी एकेकाळी रेल्वेस्थानकात जाऊन तिथून प्रवासासाठीची तिकिटं बुक करण्याचे दिवसही आता मागे पडले. कारण, प्रगत तंत्रज्ञानामुळं या आणि अशा अनेक गोष्टी Online पद्धतीनंच हाताळल्या जात आहेत.
मुख्य म्हणजे या (Online Ticket Booking) ऑनलाईन तिकिट पद्धतीनं अनेक कामं सोपी आणि सुकर केली असली तरीही त्यामध्ये येणारे Error मात्र नाकीनऊ आणतात. त्यातच जर तिकीटाच्या बुकींगदरम्यान तुमच्याकडून एखादी चूक झालीच तर प्रवास विसराच.
वय आणि लिंग याबाबतची माहिती चुकवल्यास त्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाहीत. कारण, IRCTC च्या संकेतस्थळावर हा पर्यायच उपलब्ध नाहीये. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला हा बदल करता येणार नाही. शिवाय तुम्ही तुमच्या नावातही कोणताच बदल करू शकत नाही. किंबहुना आयआरसीटीसी अशी कोणतीही सुविधा देत नाही.
तिकीटांमध्ये होणारी अफरातफर, फसवाफसवी या साऱ्याला रोखण्यासाठी वय आणि लिंग हे दोन निकष रेल्वेकडून ग्राह्य धरले जातात. तरीही नजरचुकीनं तुमच्याकडून वयाचा आकडा चुकल्यास किंवा लिंग निवडताना चूक झाल्यास तिकीट रद्द करण्यावाचून इतर कोणताही पर्याय तुमच्याकडे नसतो. त्यामुळं नव्यानं तिकीट बुक करणं ही एकमेव वाट तुमच्यासाठी मोकळी असते.
तिकीटातील माहिती चुकल्यास आणि ती रद्द होऊ न देण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या रेल्वे स्थानकावर जाऊन चीफ रिजर्वेशन सुपरवाइजर (CRS)ची भेट घ्या. तिथं त्यांनी तिकीटावर शिक्का मारल्यास तुम्ही प्रवास करु शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला वयाचा अधिकृत पुरावा प्रवासादरम्यान सोबत बाळगावा लागेल. रेल्वे प्रवास सुरु होण्याच्या 24 तासांआधी तिकीटावर शिक्का घेणं अपेक्षित आहे. पण, प्रत्येकवेळी हा शिक्का सहजासहजी मिळेलच असं नाही. त्यामुळं तुम्हाला इथं संपूर्ण प्रकरण समोरील अधिकाऱ्यांना पटवून सांगावच लागेल.