मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिच्या विवाहसोहळ्याला अवघे काही तास उरले असताना आता सोशल मीडियावरही या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पिरामल उद्योग समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी इशा विवाहबंधनात अडकणार आहे.
सध्या अंबानी आणि पिरामल या दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नसोहळ्याचीच धामधूम सुरु असून, काही दिवसांपूर्वीच इशा आणि आनंदचा प्री- वेडिंग सोहळाही पार पडला. जेव्हा राजकीय नेतेमंडळींपासून कलाविश्वातील प्रसिद्ध चेहऱ्यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
इशाचा संगीत सोहळा हा खऱ्या अर्थाने सर्वांचच लक्ष वेधून गेला. यातच मुकेश अंबानी हे एक वडील म्हणून पहिल्यांदाच मोकळेपणाने सर्वांसमोर आल्याचंही पाहायला मिळालं. लाडक्या लेकीला आता अवघ्या काही दिवसांमध्ये सासरी पाठवताना कोणत्याही वडिलांच्या मनात ज्या भावना असतात त्याच भावनांनी अंबानी यांच्याही मनात घर केलं होतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिड़िओमध्ये ते आपल्या मुलीविषयी आणि तिच्या होणाऱ्या पतीविषयी भावनांना वाट मोकळी करुन देताना दिसत आहेत. 'मुलीला सासरी पाठवत असलो तरीही आमच्या आयुष्यात आनंदचा प्रवेश होत आहे', असं म्हणत त्यांनी खऱ्या अर्थाने आनंदशी असलेलं नातं सर्वांसमोर ठेवलं. यावेळी हळव्या मनाचे मुकेश अंबानी सर्वांनीच पाहिले.
#MukeshAmbani makes #IshaAmbani and #AnandPiramal's sangeet ceremony all the more special with this beautiful message #IshaAmbaniSangeet #IshaAmbaniWedding pic.twitter.com/P5al5rPTwJ
— dna After Hrs (@dnaAfterHrs) December 10, 2018
अंबानी कुटुंबात येणारा हा 'आनंद' खऱ्या अर्थाने त्यांच्या आणि इशाच्या जीवनात हर्षोल्हासाची उधळण करो, हीच इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. १२ डिसेंबवरला इशा आणि आनंद यांचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या विवाहसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून, आता पाहुणे मंडळींनीही येण्यास सुरुवात केली आहे. उद्योग, कला, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती इशा- आनंदच्या विवाहसोहळ्याला असणार आहे.