सूरत : तुम्हाला सचिन तेंडुलकरची फरारी गाडी आठवतेय? होय, तीच ती लाल रंगाची मानाची फरारी... जिच्यावरून करमाफीचा मोठा वाद झाला, अगदी बॉलिवूडचा सिनेमाही आला... तीच ती फरारी... ही फरारी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलीय. आधीच फरारी... त्यात सचिन तेंडुलकरची फरारी... मग भाव खायला कुणाला आवडणार नाही... मायकल शूमाकरनं सचिन तेंडुलकरला गिफ्ट दिलेली लालचुटूक रंगाची कार '३६० मोडेना फरारी'...
क्रिकेटचे भीष्म पितामह सर डॉन ब्रॅडमॅन यांचा २९ शतकांचा विक्रम सचिननं मोडला, तेव्हा ही कार त्याला गिफ्ट देण्यात आली होती. तब्बल साडे आठ कोटी रुपये किंमतीच्या या फेरारीसाठी सचिनला २ कोटी रुपयांचा आयात कर भरावा लागला होता. त्यावेळी सचिननं करमाफीची मागणी केल्यानं मोठा वादही रंगला होता. २०११ मध्ये सचिननं ही फरारी कार सूरतचे व्यापारी आणि राजहंस ग्रुपचे मालक जयेश देसाई यांना विकली...
मध्यंतरी या फरारीवर आधारित 'फरारी की सवारी' हा हिंदी सिनेमाही गाजला. विशेष म्हणजे या लालचुटूक फरारीची क्रेझ अजून काही केल्या कमी झालेली नाही... त्यामुळंच की काय, संसाराचा त्याग करून संन्यासी बनण्याची दीक्षा घेण्यापूर्वी १७ वर्षांच्या तरुणीची इच्छा झाली ती सचिनच्या फरारीची सवारी करण्याची... येत्या २६ फेब्रुवारीला सूरतची स्तुती शाह साध्वी बनणार आहे. त्याआधी सचिनच्या फरारीत बसण्याची मनोकामना तिच्या वडिलांनी पूर्ण केली... संपूर्ण सूरत शहरात फरारीमधून स्तुतीची शोभायात्रा काढण्यात आली.
अशी इच्छा व्यक्त करणारी स्तुती शाह एकमेव नाहीय... गेल्यावर्षी सूरतच्या हिरे व्यापाऱ्याच्या १२ वर्षांच्या मुलानं संन्यासी म्हणून दीक्षा घेतली, तेव्हा त्यानंही सचिनच्या फरारीतून सवारी केली होती... संसाराच्या मोहजालाचे पाश तोडण्याआधी या फरारीची सवारी करण्याची इच्छा होते, यावरूनच सचिनची ही फरारी किती अनमोल आहे, याची साक्ष पटते.