एकाच शाळेचे 3 विद्यार्थी बनले वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री

एखाद्या शाळेतून शिकलेले 3 विद्यार्थी मुख्यमंत्री होणं ही पहिलीच वेळ आहे. 

Updated: Dec 22, 2018, 08:35 PM IST
एकाच शाळेचे 3 विद्यार्थी बनले वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री  title=

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिग्गज नेता कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच ते 'दून' शाळेत शिकलेले तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचे समकालिन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील दून शाळेचेच विद्यार्थी आहेत. उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील दून शाळाही देशातच नव्हे तर जगातील प्रतिष्ठीत शाळा म्हणून ओळखली जाते. एखाद्या शाळेतून शिकलेले 3 विद्यार्थी मुख्यमंत्री होणं ही पहिलीच वेळ आहे. 

1964 च्या बॅचचे विद्यार्थी असलेले कमलनाथ यांच्याकडे मध्य प्रदेशची सुत्र देण्यात आली. कॉंग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव यासाठी पुढे होते. विशेष बाब म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया देखील याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. 

कमलनाथ यांच्या नावावर मोहर उमटवणारे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपले सुरूवातीचे शिक्षण याच दून शाळेतून केले आहे. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांना परत बोलावण्यात आलं आणि राहुल यांनी घरीच आपलं शिक्षण पूर्ण केलं. दून शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मध्ये राहुल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

दूनने दिला पंतप्रधान 

राहुल यांचे वडील राजीव गांधी आणि काका संजय गांधी यांनी देखील प्राथमिक शिक्षण दून शाळेतून केले. त्यामुळे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर राजीव गांधींच्या रुपात दून शाळेने देशाला पंतप्रधान देखील दिला आहे.  कमलनाथ आणि संजय गांधी दून शाळेत एकत्र शिकत होते. त्यामुळेच कमलनाथ हे गांधी परिवाराच्या खूप जवळचे राहिले. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा क्षेत्रातून ते सलग 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले. कॉंग्रेसमध्ये कमलनाथ यांना इंदिरा गांधीचे तिसरे पुत्र म्हणून ओळखले जाते.

ओडीशाचे मुख्यमंत्री 

बीजू जनता दलचे नेता नवीन पटनायक देखील कमलनाथ यांच्यापेक्षा एक वर्षे सिनियर आहेत. नवीन पटनायक हे दून शाळेच्या 1963 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. 18 वर्षांपासून मुख्यमंत्री पदावर असलेले नवीन हे राज्याचे 14 वे मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांचे वडील बीजू पटनायक देखील दोन वेळा ओडीशाचे मुख्यमंत्री बनले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंह 

महाराजा यादविंदर सिंह यांचे पुत्र अमरिंदर सिंह हे सध्या पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी देहरादूनच्या वेल्हम बॉईज आणि दून शाळेतून शिक्षण पूर्ण केलं. अमरिंदर दून शाळेच्या टाटा हाऊस हॉस्टेलमध्ये रहायचे. जिथे पुर्व केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर देखील राहत असत.